धोनीच्या टीशर्टवरील मेसेजने खळबळ! चाहत्यांमध्ये रंगली जोरदार चर्चा

आयपीएलचं 18 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या पर्वात कोण बाजी मारणार? याची चर्चा तर रंगली आहे. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीही लाईमलाईटमध्ये आहे. धोनी अजून किती खेळणार याची चर्चा रंगली आहे. असं असताना धोनीच्या टीशर्टवरील मेसेज बरंच काही सांगून जात आहे.

धोनीच्या टीशर्टवरील मेसेजने खळबळ! चाहत्यांमध्ये रंगली जोरदार चर्चा
| Updated on: Feb 26, 2025 | 10:30 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने पहिल्या दोन सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. 9 मार्चला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने आयपीएल 2025 स्पर्धेला रंग चढायला सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंह धोनी यावेळी चर्चेच्या मध्यभागी आहे. मागच्या चार पाच पर्वापासून धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा आहे. मात्र या सर्व प्रश्नांना बगल देत धोनी खेळताना दिसतो. यंदाच्या पर्वातही धोनी मैदानात उतरणार हे निश्चित आहे. पण धोनीचं हे शेवटचं पर्व आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण याचं ठोस असं उत्तर कोणाकडेच नाही. पण धोनीने याबाबत अप्रत्यक्षरित्या सांगून टाकल्याचं दिसत आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा सराव शिबीर सुरु झालं आहे. यावेळी चेन्नई सुपर किंग्स सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स मैदानात उतरणार आहे. संघाच्या सराव शिबिरात भाग घेण्यासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 26 फेब्रुवारीला चेन्नईला पोहोचला. यावेळी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने गळाभेट घेत त्याचं स्वागत केलं.

महेंद्रसिंह धोनी चेन्नईत काळ्या रंगाचं टीशर्ट घालून आला होता. पण त्या टीशर्टवरील मेसेजने त्याच्या चाहत्यांची झोप उडाली आहे. टीशर्टवर डॉट्स आणि डॅशपासून एक डिझाईन दिसत आहे. त्यावर मोर्स कोडमध्ये काही लिहिलेलं होतं. मोर्स कोडचा वापर गुपित मेसेज देण्यासाठी केला जातो. याचा वापर मिलिट्रीत केला जातो. धोनीचं मिलिट्री प्रेम सर्वांनाच माहिती आहे. युजर्संनी या कोडचा डिकोड केला आणि मेसेजचा अर्थ काढला. तेव्हा इंग्रजीत वन लास्ट टाईम म्हणजे पुन्हा एकदा शेवटचं.. असं लिहिलं होतं. यावरून धोनीचं हे शेवटचं पर्व असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.