MUM vs MGLY : मुंबईच्या गोलंदाजांसमोर मेघालय उद्धवस्त, 86 धावांवर पॅकअप, शार्दूलचा धमाका

Mumbai vs Meghalaya Ranji Trophy : मुंबईच्या गोलंदाजांनी मेघालयच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं. मेघालयच्या 5 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. शार्दूल ठाकुर याने हॅटट्रिकसह 4 विकेट्स घेतल्याने मेघालयचं 86 धावांवर पॅकअप झालं.

MUM vs MGLY : मुंबईच्या गोलंदाजांसमोर मेघालय उद्धवस्त, 86 धावांवर पॅकअप, शार्दूलचा धमाका
shardul thakur mum vs mgly ranji trophy
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 30, 2025 | 12:49 PM

मुंबई क्रिकेट टीमने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात अप्रितम सुरुवात केली आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्याला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मेघालयाचा करेक्ट कार्यक्रम केला. ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याने घेतलेल्या हॅटट्रिकने मेघालयच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं. त्यामुळे मेघालयला 100 धावाही करता आल्या नाहीत. मेघालयचा डाव हा अवघ्या 86 धावांवर आटोपला. त्यामुळे आता मुंबईकडे पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून भक्कम आघाडी घेण्याची संधी आहे. मुंबईसाठी हा ‘आर या पार’ असा सामना आहे. त्यामुळे आता मुंबईचे फलंदाज कशी कामगिरी करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबईच्या गोलंदाजांसमोर मेघालयच्या 5 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. निशांत चक्रवर्ती, किशन लिंगडोह, बालचंदर अनिरुद्ध, सुमित कुमार आणि जसकीरत सिंग हे पाचही फलंदाज आले तसेच भोपळा न फोडता माघारी परतले. मेघालयसाठी फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. हिमन फुकन याने सर्वाधिक 28 धावांचं योगदान दिलं. प्रिंगसंग संगमा याने 19 धावा जोडल्या. अनिश चरक याने 17 तर कॅप्टन आकाश चौधरीने 16 धावा केल्या.

मुंबईकडून शार्दूल ठाकुर याने हॅटट्रिकसह सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शार्दूलने 11 ओव्हरमध्ये 43 धावांच्या मोबदल्यात चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहित अवस्थी याने तिघांना बाद केलं. सिल्वेस्टर डिसूझा याने 2 विकेट्स मिळवल्या. तर शम्स मुलानी याने एकमेव विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

शार्दूल ठाकुरची हॅटट्रिक

मेघालय प्लेइंग इलेव्हन : आकाश चौधरी (कर्णधार), अर्पित सुभाष भटेवरा (विकेटकीपर), निशांत चक्रवर्ती, बालचंदर अनिरुद्ध, हिमन फुकन, सुमित कुमार, प्रिंगसंग संगमा, जसकीरत सिंग, अनिश चरक, किशन लिंगडोह आणि नफीस सिद्दीकी.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, आकाश आनंद (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शम्स मुलानी, अमोघ भटकळ, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, सिल्वेस्टर डिसूझा आणि मोहित अवस्थी.