मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये फक्त 20 लाख! 4.6 कोटीचे दोन खेळाडू घेतले; आता पुढे काय?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे. मुंबई इंडियन्सकडे दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाची वेगळीच छाप पडते. असं असताना मुंबई इंडियन्सने 4.6 कोटी खर्च करून दोन अतिरिक्त खेळाडू घेतले आहे.

मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये फक्त 20 लाख! 4.6 कोटीचे दोन खेळाडू घेतले; आता पुढे काय?
मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये फक्त 20 लाख! 4.6 कोटीचे दोन खेळाडूंना घेतलं; आता पुढे काय?
Image Credit source: Pankaj Nangia/Getty Images
| Updated on: Nov 13, 2025 | 9:07 PM

आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायझींना 120 कोटी रुपयांचं बजेट दिलं गेलं होतं. रिटेन्शन केलेल्या खेळाडूंची रक्कम वजा करता उर्वरित रक्कम मेगा लिलावात वापरता येणार होती. मुंबई इंडियन्सने अष्टपैलू हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यासारख्या दिग्गज खेळाडूंना रिटेन करत 75 कोटी खर्च केले होते. तसेच मेगा लिलावात 45 कोटींसह उतरली होती. यात मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 18 खेळाडूंसाठी बोली लावली आणि 44 कोटी 80 लाख रूपये खर्च केले. त्यामुळे पर्समध्ये फक्त 20 लाख उरले होते. आता मुंबई इंडियन्स संघात दोन नव्या खेळाडूंची भर पडली आहे. मुंबई इंडियन्सने ट्रेड विंडोच्या माध्यमातून लखनौ सुपर जायंट्सकडून शार्दुल ठाकुरला 2 कोटी, तर गुजरात टायटन्सकडून 2.6 कोटीला रदरफोर्डला विकत घेतलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची पर्स मायनसमध्ये गेली आहे. 4.6 कोटीतून 20 लाख वजा करता मुंबईला 4.2 कोटींची आवश्यकता आहे. आता हे पैसे कुठून आणणार असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.

मुंबई इंडियन्सने अद्याप रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलेली नाही. 15 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई इंडियन्स खेळाडूंची यादी जाहीर करेल. त्यानंतर पर्स प्लसमध्ये येईल यात काही शंका नाही. मुंबई इंडियन्स दीपक चहर, जॉनी बेअरस्टो आणि चरिथ असलंका यांना रिलीज करण्याची शक्यता आहे. कारण या तिघांवर मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने मोठी रक्कम मोजली आहे. त्या तुलनेत त्यांच्याकडून हवी तशी कामगिरी झालेली नाही. दीपक चाहरसाठी 9.25 कोटी, जॉनी बेअरस्टोसाठी 5.25 कोटी आणि चरीथ असलंकासाठी 75 लाख मोजले होते. या तीन खेळाडूंना रिलीज केलं तरी मुंबईच्या पर्समध्ये 15 कोटी 25 लाख रुपये जमा होतील. यामुळे मिनी लिलावात इतर खेळाडू घेता येतील.

आयपीएल मिनी लिलावाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 16 डिसेंबरला दुबईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. मिनी लिलावाच्या एक आठवड्याआधीपर्यंत ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करता येणार आहे. त्यामुळे रिटेन्शन यादी जाहीर झाली की पर्समध्ये पैसे वाढतील आणि खेळाडूंच्या देवाणघेवाणीला जोर येईल. आता फ्रेंचायझी कोणत्या खेळाडूंना रिलीज याकडे लक्ष लागून आहे.