टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी 16वा संघ पात्र ठरला, पाकिस्तानची धाकधूक वाढली!

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेसाठी 16व्या संघाची निवड झाली आहे. आता फक्त 4 संघांची निवड होणं बाकी आहे. कोणता संघ पात्र ठरला आणि कसा ते जाणून घेऊयात..

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी 16वा संघ पात्र ठरला, पाकिस्तानची धाकधूक वाढली!
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी 16वा संघ पात्र ठरला, पाकिस्तानची धाकधूक वाढली!
Image Credit source: ICC
| Updated on: Oct 02, 2025 | 5:05 PM

आशिया कप 2025 स्पर्धेनंतर आता आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धा फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळे आता या स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार असून त्यापैकी 16 संघ ठरले आहेत. 16 व्या संघाने अफ्रिका झोनमधून एन्ट्री मिळवली आहे. आफ्रिका पात्रता फेरीतून दोन पैकी एक संघ ठरला आहे. आफ्रिका प्रादेशिक पात्रता स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात नामिबियाने टांझानियाला 63 पराभूत करत आपलं स्थान पक्कं केलं नामिबिया पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 विश्वचषकात खेळणार आहे. या झोनमधून आणखी एक संघ ठरणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत झिम्बाब्वे आणि केनिया यांच्यातील एक संघ पुढील वर्षीच्या टी20 स्पर्धेसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ असेल.

भारत आणि श्रीलंका यांच्याकडे यजमानपद असल्याने थेट पात्र ठरलेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज , कॅनडा आणि यूएसए यांनीही टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये स्थान मिळवलं होतं. त्यामुळे या संघांची थेट निवड झाली. टी20 रँकिंगच्या आधारे आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांनीही या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. अमेरिका प्रादेशिक पात्रता फेरीतून कॅनडाने जागा मिळवली आहे. तर युरोपियन पात्रता फेरीतून नेदरलँड आणि इटलीची जागा निश्चित झाली आहे. आफ्रिका प्रादेशिक पात्रता फेरीतून नामिबियाने जागा मिळवली असून 16वा संघ ठरला आहे.

आशियाई-ईएपी पात्रता फेरीतून तीन संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. ही स्पर्धा 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, कुवेत, मलेशिया, जपान, कतार, सामोआ आणि युएई यांच्यात स्पर्धा आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी असे 20 संघ ठरणार आहेत. दरम्यान नामिबियाने टी20 वर्ल्डकप 2021 मध्येही जागा मिळवली होती. तेव्हा पाकिस्तानची दमछाक केली होती. आफ्रिका पात्रता फेरीत नामिबियाने टांझानियासमोर विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण टांझानियाचा संघ 20 षटकात 8 गडी गमवून 111 धावा करू शकला.