PAK vs BAN: पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव, कॅप्टनने कुणाला ठरवलं कारणीभूत?

Pakistan vs Bangladesh 1st Test: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना बरोबरीत सुटेल, अशी चिन्हं चौथ्या दिवशी होती. मात्र बांगलादेशने पाचव्या दिवशी कमबॅक केलं आणि इतिहास रचला.

PAK vs BAN: पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव, कॅप्टनने कुणाला ठरवलं कारणीभूत?
shaan masood press conference
Image Credit source: Pakistan Cricket X Account
| Updated on: Aug 25, 2024 | 11:31 PM

बांगलादेश क्रिकेट टीमने 25 ऑगस्टला पाकिस्तानवर पहिल्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेशने या विजयासह इतिहास रचला. बांगलादेशचा पाकिस्तान विरुद्धचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिलावहिला विजय ठरला. बांगलादेशला पाकिस्तान विरुद्ध पहिल्या कसोटी विजयासाठी तब्बल 13 सामन्यांची वाट पाहावी लागली. मात्र अखेर बांगलादेशच्या विजयाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. बांगलादेशने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

पाकिस्तानने पहिल्या डाव 448 धावांवर घोषित केला. बांगलादेशने प्रत्युत्तरात 565 धावा केल्या. बांगलादेशने यासह 117 धावांची आघाडी घेतली. बांगलादेशने पाकिस्तानला दुसर्‍या डावात 146 धावांवर रोखलं. त्यामुळे बांगलादेशला 30 धावांचं आव्हान मिळालं. बांगलादेशने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. पाकिस्तानच्या या पराभवानंतर कॅप्टन शान मसूद चांगलाच संतापलेला दिसला.

शान मसूद काय म्हणाला?

“आमच्या टीमने चांगली कामगिरी केली नाही. अशात जेव्ही तुम्ही सामना ड्रॉ करण्यासाठी खेळता तेव्हा विचित्र गोष्टी घडतात. या दरम्यान दबावही येतो. बांगलादेशने चांगली बॉलिंग केली. त्यामुळे आम्हाला पुढील सामन्यात चमकदार कामगिरी करावी लागेल. आम्ही 4 पेसरसह खेळलो. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. आमचा हा निर्णय योग्य ठरला नाही. मात्र पुढील सामन्यात आम्ही अपयशी ठरु असं नाही”, असं मसूद पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हणाला.

“मला आमच्या खेळाडूंकडून फार अपेक्षा होत्या, मात्र त्यांना तसं करता आलं नाही. तसेच हवामानामुळे पहिल्या दिवसातील अर्धा वेळ हा वाया गेला. त्यामुळे हवामानाची फटका बसला. आम्ही येथे 9 दिवसांपासून आहोत आणि दररोज पाऊस पडतोय”, असंही मसूदने म्हटलं.

पाकिस्तानच्या पराभवाबाबत कॅप्टनला काय वाटतं?

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.