
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यावरही बांगलादेशने मजबूत पकड मिळवली आहे. पाकिस्तानने दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 172 धावा केल्या आणि विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तानकडे पहिल्या डावात 12 धावांची आघाडी होती. त्यामुळे बांगलादेशला पाहायला गेलं तर सोपं आव्हान आहे. पण हे आव्हान कठीणही होऊ शकतं असं वाटत होतं. पण बांगलादेशने दुसऱ्या डावाची सुरुवात आक्रमक केली. शदमन इस्लाम आणि झकीर हसन या जोडीने बांगलादेशला आक्रमक सुरुवात करून दिली. 7 षटकात बिनबाद 42 धावा केल्या. झकीर हसनने 23 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार मारत 31 धावा केल्या. तर शदमन इस्लाम विकेट सांभाळून खेळत आहे. त्याने 19 चेंडूंचा सामना करत 9 धावा केल्या आहेत. बांगलादेश आक्रमक खेळत असताना चौथ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला. त्यामुळे पाचव्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 143 धावा हव्या आहेत. बांगलादेशच्या हातात 10 विकेट असल्याने हा विजय सोपा असल्याचं दिसत आहे. पण पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात काय होते त्यावर सर्वकाही ठरणार आहे.
बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला तर इतिहासात नोंद होईल. कारण बांगलादेश संघ दुसऱ्या देशात खेळून पहिल्यांदा एखाद्या संघाला कसोटीत व्हाईटवॉश देणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानसाठी ही करो या मरोची लढाई आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला तर मालिकेत बरोबरी होईल. हा सामना ड्रॉ झाला तरी पाकिस्तानला ही मालिका गमवावी लागणार आहे. पाचव्या दिवसाचा खेळ बाकी असल्याने या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. हा निकाला बांगलादेशच्या बाजूने 97 टक्के, तर पाकिस्तानच्या बाजूने 3 टक्के आहे. असं असताना मंगळवारी रावळपिंडीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसामुळे हा सामना रद्द करण्याची वेळ आली तरी हा सामना बांगलादेश जिंकेल. जर पाऊस पडला नाही तर पाकिस्तानला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या दिवशी 143 धावांच्या आत 10 विकेट घ्याव्या लागतील.
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात मोहम्मद रिझवान आणि अघा सलमान वगळता एकही फलंदाजी चांगली कामगिरी करू शकला नाही. मोहम्मद रिझवानने 43, तर अघा सलमानने 47 धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. शफीकने 3, सइम अयुबने 20, खुर्रम शहजाद 0, शान मसूद 28, बाबर आझम 11, सउद शकील 2, मोहम्मद अली 0, अप्रबार 2 आणि मीर हमजा 4 धावा करून बाद झाले. अघा सलमान 47 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून हसन महमुदने 5, नहिद राणाने 4 आणि तस्किन अहमदने 1 विकेट घेतली.