
पर्थ: टी 20 वर्ल्ड कपमध्ये अखेर पाकिस्तानच्या टीमला पहिला विजय मिळाला. सलग दोन पराभवांमुळे पाकिस्तानच्या टीमवर मोठा दबाव होता. वर्ल्ड कपमधील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना विजय मिळवण आवश्यक होतं. नेदरलँड्स सारख्या दुबळ्या प्रतिस्पर्ध्यावर त्यांनी एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तानने नेदरलँडसवर 6 विकेट राखून विजय मिळवला.
सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नाही
पाकिस्तानसाठी टी 20 वर्ल्ड कपची खराब सुरुवात झाली आहे. आधी टीम इंडियाने त्यांना शेवटच्या चेंडूवर हरवलं. त्यानंतर झिम्बाब्वे सारख्या दुबळ्या प्रतिस्पर्ध्याने त्यांच्यावर 1 रन्सने विजय मिळवला. सलग दोन पराभवांमुळे पाकिस्तावर चहूबाजूंनी टीका सुरु होती. पाकिस्तानने आजचा सामना जिंकला असला, तरी सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग सोपा नाहीय.
पुढचे दोन सामने कोणाविरुद्ध?
यापुढचे दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश विरुद्धचे सामने त्यांना जिंकावेच लागतील. त्याशिवाय त्यांना ग्रुप 2 मधील दुसऱ्या देशाच्या निकालांवर सुद्धा लक्ष ठेवाव लागेल. आज पाकिस्तानने नेदरलँडस विरुद्ध जबरदस्त सुरुवात केली.
पाकिस्तानकडून कोणी विकेट घेतल्या?
पाकिस्तानच्या वेगवान तोफखान्यासमोर नेदरलँडसची टीम 100 धावांपर्यंत पोहोचू शकली नाही. नेदरलँड्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 91 धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक 3 विकेट काढल्या. मोहम्मद वसिमने 2, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसिम शाह यांनी प्रत्येकी एक विकेट काढला.
मोहम्मद रिजवानची हाफसेंच्युरी हुकली
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी नेदरलँड्सच्या फलंदाजांना मोकळेपणाने फलंदाजी करु दिली नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन त्यांना जखडून ठेवलं. विजयासाठी मिळालेले 92 धावांच लक्ष्य पाकिस्तानने 4 विकेट गमावून आरामात पार केलं. बाबर आजम आज 4 धावांवर रनआऊट झाला. फखर झमनने 20 धावा केल्या. मोहम्मद रिजवान 49 रन्सवर बाद झाला.