
आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानला डोकंच वर काढू दिलं नाही. पाकिस्तानच्या डावात सुरुवातीला काही झेल सुटल्याने रणनिती फसली. पण त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने डोकं शांत ठेवून योजना अवलंबल्या. त्याचा परिणाम दिसून आला. पाकिस्तानने पावर प्लेमध्ये 1 गडी गमवून 55 धावा केल्या होत्या. तर दहा षटकात 1 बाज 91 अशी स्थिती होती. त्यामुळे पाकिस्तानची विकेटसोबत धावगती कमी करण्याचं आव्हान होतं. भारतीय फिरकीविरुद्ध पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती. आकडेवारीवरून कर्णधार सूर्यकुमार यादवला हे माहिती होतं. त्यामुळे त्याने फिरकी गोलंदाजांना विकेट मिळत नसली तरी धावगती कमी करण्याच्या हेतूने त्यांचा पुरेपूर वापर केला. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला फिरकी गोलंदाजांना तोंड देणे कठीण गेले. पाकिस्तानी खेळाडू फिरकीपटूंचा सामना करताना अनेकदा झाडू मारतात. म्हणजेच स्वीप शॉट्स खेळतात. पण यावेळी त्यांचं गणित चुकलं.
पाकिस्तानी फलंदाजांनी 20 चेंडूवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना 20 धावाही काढता आल्या नाहीत. पाकिस्तानी फलंदाज सहसा चौकार मारण्यासाठी स्वीप करतात. अनेकदा फिरकीसमोर पाकिस्तानी फलंदाज हे अस्त्र वापरतात. पण भारताची फिरकी इतकी प्रवाभी होती की त्यांना तसं करणं जमलंच नाही. भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध ते अपयशी ठरले. पाकिस्तानने 20 चेंडूत स्वीप मारत फक्त 18 धावा केल्या. पाकिस्तानने फिरकी गोलंदाजांना स्वीप करण्याच्या प्रयत्नात 5 गडी गमावले.
दुसऱ्या टी 20 सामन्यात कुलदीप यादवने फक्त 1 विकेट घेतली. पण त्याने धावांची गती रोखली. त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 31 धावा दिल्या. त्याच वेळी वरुणने चार षटकांमध्ये फक्त 25 धावा दिल्या. पण त्याला काही विकेट मिळाली नाही. पण सूर्यकुमार यादवचा प्लान यशस्वी ठरला. पाकिस्तानचा संघ चुकून अंतिम फेरीत समोर आला तर अशीच रणनिती असण्याची शक्यता आहे. पण यापूर्वी त्यांना श्रीलंकेविरुद्धचा सामना काहीही करून जिंकावा लागेल. कारण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे.