IND vs PAK : टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीत धमाकेदार सुरुवात, पाकिस्तानला 109 धावांनी लोळवलं

PD T20 Champions Trophy 2025 : दिव्यांग भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर 109 धावांनी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.

IND vs PAK : टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीत धमाकेदार सुरुवात, पाकिस्तानला 109 धावांनी लोळवलं
PD T20 Champions Trophy 2025 IND vs PAK Match Result
Image Credit source: Differently Abled Cricket Council of India X Account
| Updated on: Jan 12, 2025 | 8:25 PM

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी 20i चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत धमाकेदाक विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानने टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला अवघ्या 51 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने यासह 109 धावांनी जबरदस्त विजय मिळवला.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडियाने सामन्यातील पहिल्या डावात बॅटिंग केली. टीम इंडियाने 19 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. टीम इंडियासाठी निखील मनहास याने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली. तर कर्णधार विक्रांत केणी याने 37 धावांची स्फोटक खेळी केली होती. विक्रांतने 23 बॉलमध्ये ही खेळी केली. प्रत्युत्तरात पाकिस्तानची घसरगुंडी झाली. पाकिस्तानचं 51 धावावंर पॅकअप झालं. पाकिस्तानसाठी अब्दुला एजाज याने सर्वाधिक 11 धावा केल्या. टीम इंडियासाठी जितेंद्र वीएन याने अवघ्या 5 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. भारताने अशाप्रकारे पहिला विजय मिळवला.

12 जानेवारीपासून सुरुवात

दरम्यान दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला रविवार 12 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा श्रीलंकेकडे आहे. टीम इंडिया या स्पर्धेत आणखी 5 सामने खेळणार आहे. टीम इंडियाचा या स्पर्धेतील दुसरा सामना सोमवारी 13 जानेवारी रोजी होणार आहे. टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे.

टीम इंडियाची विजयी सलामी, पाकिस्तानला लोळवलं

दिव्यांग टीम इंडियाच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 13 जानेवारी, सकाळी 9 वाजता

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, 15 जानेवारी, दुपारी 1 वाजता

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 16 जानेवारी, दुपारी 1 वाजता

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 18 जानेवारी, सकाळी 9 वाजता

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, 19 जानेवारी, दुपारी 1 वाजता

21 जानेवारी, महाअंतिम सामना