
रणजी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्र संघात सराव सामना सुरु आहे. हा सामना एमसीए मैदानात सुरु आहे. या सामन्यात महाराष्ट्रकडून खेळताना पृथ्वी शॉने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 219 चेंडूंचा सामना करत 181 दावा ठोकल्या. मुंबईला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपल्या जुन्या संघाविरुद्ध शतक ठोकलं आहे. पण या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर मैदानात राडा झाला. पृथ्वी शॉ मैदानात मुंबईच्या जुन्या सहकाऱ्यांना भिडला. त्यामुळे पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सराव सामन्यात शतकी खेळी केल्याने त्याने पुन्हा एकदा आपला दावा दाखल केला आहे. पण मैदानात काय झालं की पृथ्वी शॉच्या तळपायाची आग मस्तकात गेली. चला जाणून घेऊयात काय आहे प्रकरण ते..
महाराष्ट्रकडून फलंदाजी करताना पृथ्वी शॉने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. पृथ्वी शॉ 73.2 षटकांपर्यंत मैदानात टिकून राहिला. इतकंच काय 219 चेंडूत 181 धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीमुळे महाराष्ट्राच्या संघाला 430 धावापर्यंत मजल मारता आली. पण जेव्हा बाद झाला तेव्हा मात्र मैदानात राडा झाला. मुशीर खानने पृथ्वी शॉला बाद केले. यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी पृथ्वी शॉला डिवचलं. काही शब्द पृथ्वी शॉच्या हृदयाला भिडले आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो थेट मुंबईच्या खेळाडूंवर भडकला आणि ओरडू लागला. जेव्हा प्रकरण वाढलं तेव्हा पंचांनी मध्यस्थी केली आणि प्रकरण सोडवलं.
Heated exchange between Prithvi Shaw and Mumbai players after his wicket! pic.twitter.com/l9vi1YgeYs
— INSANE (@1120_insane) October 7, 2025
पृथ्वी शॉने या सामन्यात जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवलं. गेल्या काही महिन्यांपासून तो फॉर्मच्या शोधात होता. अखेर रणजी स्पर्धेपूर्वी त्याला सूर गवसताना दिसत आहे. त्याने अष्टपैलू अर्शीन कुलकर्णीसोबत पहिल्या विकेटसाठी 305 धावांची भागीदारी केली. या सामन्यात फलंदाजी करताना पृथ्वी शॉ वेगळ्याच लयीत दिसला. त्याने 84 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर 144 चेंडूत शतकाला गवसणी घातली. त्याच्या या खेळीमुळे रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करणार हे संकेत मिळाले आहे. दुसरीकडे, टीम इंडियात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजाचा शोध सुरु आहे. करूण नायरनंतर साई सुदर्शनही फेल गेला आहे. जर पृथ्वी शॉची बॅट या पर्वात चालली तर कदाचित त्याच्यासाठी कसोटी संघाची दारं खुली होऊ शकतात.