टीम इंडियाचे दोन दिग्गज क्रिकेटपटू आमनेसामने, आता निकालाचा चेंडू आयसीसीच्या कोर्टात
सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाने क्रिकेटचं मैदान गाजवलं. आशिया कप स्पर्धेत एकही सामना न गमावता मैदान मारलं. या स्पर्धेत भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

भारतीय क्रिकेट संघासाठी मागचा महिना आनंदात गेला. सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केली. एकही सामना न गमावता जेतेपदाला गवसणी घातली. इतकंच काय तर पाकिस्तानला पराभवाची तीनदा धूळ चारली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या खेळाडूंमधून आयसीसीने दोन भारतीय खेळाडूंना प्लेयर ऑफ द मंथ सप्टेंबर 2025 साठी नामांकन दिलं आहे. तर झिम्बाब्वेचा एक खेळाडूही या शर्यतीत आहे. त्यामुळे प्लेयर ऑफ द मंथनसाठी तीन खेळाडूंमध्ये थेट स्पर्धा असणार आहे. यात भारताकडून सलामीला आक्रमक फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू कुलदीप यादव याचं नाव आहे. तर झिम्बाब्वेकडून फलंदाज ब्रायन बेनेट हा शर्यतीत आहे.
अभिषेक शर्माने सप्टेंबर महिन्यात सात टी20 सामन्यात 314 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा 200 पेक्षा अधिक आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत टीम इंडियाने धडक मारली. अंतिम फेरीत त्याची बॅट काही चालली नाही. पण संपूर्ण स्पर्धेत त्याच्या नावाची दहशत होती. स्पर्धेतील याच कामगिरीसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. इतकंच काय तर पुरुष टी20 क्रमवारीत 931 रेटिंग गुणासह पहिलं स्थान पटकावलं आहे.
कुलदीप यादवनेही आशिया कप स्पर्धेत प्रतिस्पर्धी फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. त्याच्या फिरकीचा सामना करताना फलंदाजांना अडचण आली. या स्पर्धेत कुलदीप यादवने एकूण 17 विकेट घेतल्या. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 6.27 चा होता. कुलदीप यादवने प्रत्येक सामन्यात विकेट घेतली. दोन सामन्यात तर 4-4 विकेट घेतल्या. त्यामुळे त्याचं नावही शर्यतीत आहे.
झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रायन बेनेट यानेही सप्टेंबर महिन्यात चांगली कामगिरी केली. त्याने 9 टी20 सामन्यात 497 दावा केल्या. यात 55.22 च्या सरसरीने आणि 165.66 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. श्रीलंका आणि नामीबियाविरुद्धच्या मालिकेत ही चमकदार कामगिरी केली. दुसरीकडे, आयसीसी पुरुष टी20 वर्ल्डकप पात्रता फेरीच्या सलग तीन सामन्यात 72, 65 आणि 111 धावा केल्या.
