रोहित शर्मा आणि विराट कोहलीला वनडे संघातून बाहेर करावं का? दिग्गज क्रिकेटपटूने निवडीवर केला प्रश्न
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. दोघांची वनडे संघात निवड झाली आहे. पण ऑस्ट्रेलिया मालिकेत फॉर्म दाखवला नाही तर संघातून बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, या दोन्ही खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. प्रदीर्घ काळानंतर हे दोघं मैदानात उतरणार आहेत. पण या सामन्यात रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून उतरणार आहे. कारण या मालिकेपूर्वी रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतलं आहे. दुसरीकडे, विराट कोहलीचा फॉर्म कसा आहे यावरूनही चर्चा रंगली आहे. त्यामुळे या मालिकेवरच दोघांचं पुढचं करिअर अवलंबून असणार आहे. कारण या दोघांच्या निवडीवरून बरंच रणकंदन माजलं आहे. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी त्यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दिलीप वेंगसरकर यांनी एका मुलाखतीत अप्रत्यक्षपणे या दोघांच्या निवडीवर कान टोचले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वनडे संघात निवड कशी झाली? हे दोन्ही खेळाडू फीट आहेत. पण त्यांच्या फॉर्मबाबत निवडकर्त्यांना कसं काय कळलं?
दिलीप वेंगसरकर यांनी मिड डे शी बोलताना सांगितलं की, ‘रोहित आणि विराट दोघेही महान खेळाडू आहेत. पण एकच फॉर्मेट खेळणार असाल तर निवडकर्त्यांना निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही अशा खेळाडूंच्या फॉर्म आणि फिटनेसबाबत अंदाज बांधू शकत नाही. कारण ते खूप दिवस सामना खेळलेले नाहीत.’ त्यामुळे आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आपला फॉर्म सिद्ध करावा लागणार आहे. नाही तर त्यांची निवड पुढच्या वनडे मालिकेत होणं कठीण आहे. इतकंच काय तर रोहित शर्माचं वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच त्याच्या स्वप्नाबाबत स्पष्ट काय ते कळेल.
दिलीप वेंगसरकर पुढे म्हणाले की, ‘विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फॉर्मबाबत अंदाज बांधणं कठीण आहे. रोहित आणि विराटला वनडे संघात निवडलं आहे. कारण त्यांचा रेकॉर्ड चांगला आहे. ते महान खेळाडू आहेत आणि त्यांनी भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. पण टी20 आणि कसोटी खेळत नाही आणि एकाच फॉर्मेटचा भाग आहेत. तर त्यांच्या फॉर्म आणि फिटनेसबाबत कसं कळेल? पण त्यांना निवडलं असेल तर कदाचित निवडकर्त्यांनी ते तपासलं असेल. पण प्रश्न असा आहे की कसं?’
