राहुल द्रविड बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारण्यासाठी सज्ज, फक्त ही अट करावी लागणार पूर्ण

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड याची कारकिर्द उल्लेखनीय राहिली आहे. एखाद्या रुपेरी पडद्यावरील हिरोप्रमाणे त्याचा क्रिकेट कारकिर्दिचा शेवट गोड झाला आहे. त्यामुळे त्याला CEAT अवॉर्ड कार्यक्रमात बायोपिकबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने थेट उत्तर दिलं.

राहुल द्रविड बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारण्यासाठी सज्ज, फक्त ही अट करावी लागणार पूर्ण
| Updated on: Aug 22, 2024 | 4:46 PM

राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेट जगतातील मोठं नाव आहे. द वॉल म्हणून राहुल द्रविडची ख्याती सर्वदूर आहे. शोएब अख्तरसारख्या वेगवान गोलंदाजाचा चेंडू जागेवर थांबवण्याची ताकद राहुल द्रविडमध्ये होती. म्हणूनच त्याला द वॉल ही उपाधी दिली गेली. पण याच राहुल द्रविडच्या क्रिकेट जीवनात काही चढउतारही आले. 2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधारपदाची धुरा राहुल द्रविडच्या खांद्यावर होती. पण भारताचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्याने टीकेचा धनी ठरला होता. आयपीएलमध्येही राहुल द्रविडने आक्रमक खेळी करून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला होता.इतकंच काय तर त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. त्यानंतर एनसीए डायरेक्टर म्हणून भूमिका बजावली. तसेच टीम इंडियाचा यशस्वी प्रशिक्षकही ठरला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे मालिकेत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर टीम इंडियाला टी20 वर्ल्डकप जिंकवण्यात मोलाची साथ दिली. त्यामुळे राहुल द्रविडवर एखादा चित्रपट भविष्यात आला तर आश्चर्य वाटायला नको. असं असताना राहुल द्रविडने चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे.

क्रिकेट मैदानानंतर रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवण्यासाठी राहुल द्रविडने एक अट ठेवली आहे. CEAT अवॉर्ड सोहळ्यात राहुल द्रविडला बायोपिकबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने एक अट ठेवत चित्रपटात काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं. तुमच्यावर बायोपिक बनवण्याचा विचार केला गेला तर कोणाला हिरो म्हणून पसंती द्याल? तेव्हा राहुल द्रविडला हसला आणि म्हणाला की, ‘जर पैसा चांगला मिळाला तर आपल्या बायोपिक स्वत: काम करेल.’

युवराज सिंगच्या क्रिकेट कारकि‍र्दीवर लवकरच बायोपिक येणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव यांच्यावर चित्रपट आले आहेत. त्यामुळे राहुल द्रविडवर बायोपिक आला तर आश्चर्य वाटायला नको. राहुल द्रविडने आपल्या बायोपिकमध्ये स्वत: काम करण्याचे संकेत दिले आहेत. पण तत्पूर्वी भरपूर पैसा मिळायला हवेत ही अट ठेवली आहे. आता त्याची ही अट कोण मान्य करतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, राहुल द्रविड प्रशिक्षकपदावरून पायउतार झाला असून सध्या आराम करत आहे. आयपीएल 2025 मध्ये एखाद्या फ्रेंचायझीसोबत दिसू शकतो, असं सांगण्यात येत आहे.