राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा नवा मुख्य प्रशिक्षक, फ्रेंचायझीने असं केलं स्वागत

राहुल द्रविडचं आयपीएल 2025 स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन झालं आहे. राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट करून अधिकृतरित्या माहिती दिली आहे. यापूर्वी राहुल द्रविडने आयपीएलमध्ये राजस्थान आणि दिल्ली संघासाठी कोचिंग केलं आहे.

राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा नवा मुख्य प्रशिक्षक, फ्रेंचायझीने असं केलं स्वागत
| Updated on: Sep 06, 2024 | 8:08 PM

टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड याने पुन्हा एकदा आयपीएलची वाट धरली आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका बजाववणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल द्रविड राजस्थान रॉयल्ससोबत असेल, अशी चर्चा रंगली होती. पण त्यावर अधिकृत असं काही समोर आलं नव्हतं. अखेर राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने सोशल मीडियावरून अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासोबत पुन्हा एकदा दिसणार आहे. राहुल द्रविड राजस्थान रॉयल्ससोबत होता. 2014-2015 या दोन पर्वात संघाचा मेंटॉर होता. राजस्थान रॉयल्स संघाचे सीईओ जॅक लश मॅक्करम यांनी राहुल द्रविड याचं जर्सी देऊन स्वागत केलं. राहुल द्रविडची मेगा लिलावात मुख्य भूमिका असणार आहे.

राहुल द्रविडने सांगितलं की,’वर्ल्डकपनंतर पुन्हा एकदा कोचिंगमध्ये येण्यासाठी हे चांगलं माध्यम आहे.’ वर्ल्डकपनंतर नवं आव्हान स्वीकारण्यासाठी ही योग्य वेळ होती. तसेच राजस्थान रॉयल्स यासाठी योग्य ठिकाण असल्याचं सांगितलं. फ्रेंचायझीने सांगितलं की, द्रविडसोबत पुढच्या वर्षांसाठी करार केला आहे.

राहुल द्रविड 2021 मध्ये टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रूजू झाला होता. जवळपास अडीच वर्षे त्याने ही भूमिका बजावली. वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हातातोंडाशी आलेला घास गेला. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी झाली. अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून जेतेपद मिळवलं. राहुल द्रविड आयपीएल 2011 ते 2013 पर्यंत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. त्यानंतर 2014 ते 2015 कालावधीत मेंटॉर होता. आता 9 वर्षानंतर फ्रेंचायझीसोबत काम करणार आहे.

राहुल द्रविडने 2015 मध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघासोबत काम केलं. यावेळी त्याने संजू सॅमसन आणि ऋषभ पंतसारख्या खेळाडूंना ओळख मिळवून दिली. 2017 मध्ये दिल्ली साथ सोडली आणि इंडिया ए आणि अंडर 19 संघाच्या प्रशिक्षकपदी रूजू झाला. 2019 मध्ये नॅशनल क्रिकेट अकादमीत डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर 2021 मध्ये टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रूजू झाला.