सकाळी उठल्यावर डोकं दुखतं? असू शकतात या गंभीर आजारांची लक्षणे
सकाळी झोपेतून उठल्यावर जर डोके दुखत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण हे काही आजारांचे देखील लक्षण असू शकते. आता हे आजार कोणते जाणून घ्या...

अनेकांना सकाळी झोपेतून उठताच डोके जड होणे किंवा तीव्र वेदना जाणवतात. बहुतेक वेळा या वेदनेकडे दुर्लक्ष केले जाते, पण सतत असे होत राहिल्यास शरीरात काही तरी बिघाड असल्याचे संकेत असू शकतात. झोपेची कमतरता, तणाव, मायग्रेन, डिहायड्रेशन आणि स्लीप अप्निया ही सकाळच्या डोकेदुखीची प्रमुख कारणे आहेत. तज्ज्ञ सांगतात की झोपेतून उठताना मेंदूची संवेदनशीलता वाढते, त्यामुळे वेदना लवकर जाणवतात. चला तर मग जाणून घेऊया सकाळी डोके का दुखते आणि याची नेमकी कारणे काय आहेत.
१. झोपेची कमतरता किंवा खराब झोप
रात्री पुरेशी झोप न घेणे, वारंवार झोप तुटणे आणि उशिरापर्यंत स्क्रीनसमोर राहणे, याचा थेट परिणाम सकाळच्या डोकेदुखीवर होतो. झोप कमी झाल्याने मेंदूत तणाव निर्माण होतो आणि सकाळी वेदना वाढतात.
२. तणाव आणि मानसिक दबाव
जास्त तणावामुळे स्नायू आखडतात, विशेषतः मान आणि खांदे. यामुळे रक्तप्रवाह बाधित होतो आणि सकाळी उठताच टेन्शन-टाइप डोकेदुखी सुरू होते.
३. मायग्रेनची समस्या
मायग्रेनने त्रस्त असणाऱ्यांना सकाळी डोके दुखणे सामान्य आहे. झोप कमी होणे, कडक ऊन, हवामान बदल आणि रिकाम्या पोटी झोपणे हे मायग्रेन ट्रिगर करतात, ज्यामुळे सकाळी तीव्र वेदना होतात.
४. स्लीप अप्निया
स्लीप अप्नियामध्ये झोपेत श्वास वारंवार थांबतो. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. सकाळी उठताच तीव्र डोकेदुखी, चक्कर आणि जडपणा येऊ शकतो. सतत घोरणे याचे लक्षण असू शकते.
५. डिहायड्रेशन
रात्री पाणी न पिणे आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही आणि डोकेदुखी सुरू होते.
६. दारू किंवा कॅफीनचा परिणाम
रात्री दारू पिणे किंवा जास्त कॅफीन घेणे यामुळे सुस्त झोप येत नाही. तसेच अचानक कॅफीन सोडल्यानेही डोकेदुखी होऊ शकते.
रोज सकाळी डोकेदुखी होत असेल तर काय करावे?
तज्ज्ञांचा सल्ला आहे की आठवड्यात अनेक वेळा डोकेदुखी होत असेल, खूप तीव्र असेल किंवा त्यासोबत चक्कर येणे, श्वासाची तकलीफ किंवा दृष्टी धूसर होणे अशी लक्षणे असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. सकाळच्या डोकेदुखीपासून वाचण्यासाठी रोज एकाच वेळी झोपावे-उठावे, पुरेसे पाणी प्यावे (विशेषतः रात्री), झोपण्यापूर्वी कॅफीन-दारू टाळावी आणि आरामदायी झोपेचे वातावरण तयार करावे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा)
