
विदर्भाने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. विदर्भाने मुंबईचा 80 धावांनी धुव्वा उडवत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. विदर्भाने नागपूरमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईला विजयासाठी 406 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 97.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 325 धावाच करता आल्या. मुंबईसाठी शार्दूल ठाकुर याने सर्वाधिक 66 धावांची खेळी. मात्र इतर प्रमुख फलंदाजांनी घोर निराशा केली. मुंबईच्या प्रमुख फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र विदर्भाच्या गोलंदाजांनी त्यांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. तसेच शेपटीच्या फलंदाजांनी खेळी करत पराभवातील अंतर कमी केलं.
नागपुरातील ऐतिहासिक व्हीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात यजमान विदर्भाने ऑलआऊट 383 धावा केल्या. विदर्भासाठी दानिश मालेवार याने 79 आणि ध्रुव शौरे याने 74 धावांचं योगदान दिलं. तर मुंबईकडून शिवम दुबे याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
मुंबईचा पहिला डाव हा विदर्भाच्या 325 धावांच्या प्रत्युत्तरात 270 धावांवर आटोपला. मुंबईसाठी विकेटकीपर आकाश आनंद याने सर्वाधिक 106 धावा केल्या. तर पार्थ रेखाडे याने मुंबईच्या चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विदर्भाने दुसऱ्या डावात 292 धावांची खेळी केली. विदर्भासाठी पार्थ रेखाडे याने सर्वाधिक 151 धावा केल्या. तर अक्षय वाडेकर याने 52 धावा जोडल्या. तर विदर्भाकडे 113 धावांची आघाडी होती. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 406 धावांचं आव्हान मिळालं.
मुंबई टीममध्ये कर्णधार अंजिक्य रहाणेसह, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि इतर अनुभवी फलंदाज असल्याने हे आव्हान पूर्ण होईल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी निराशा केली. तर शेपटीच्या फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे मुंबईला 300 पार मजल मारता आली. शार्दूलने 66, शम्स मुलानी याने 46, मोहित अवस्थी 34, तनुश कोटीयन 26 तर रॉयस्टन डायस याने नाबाद 23 धावांचं योगदान दिलं. तर पहिल्या डावात शतक करणाऱ्या आकाश आनंद याने 39, आयुष म्हात्रे 18, सिद्धेश लाड 2, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 23 धावांचं योगदान दिलं. तर विदर्भाकडून हर्ष दुबे याने मुंबईच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर पार्थ रेखाडे आणि यश ठाकूर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्क घेतल्या.
दरम्यान रणजी ट्रॉफीसाठी केरळ विरुद्ध विदर्भ यांच्या महाअंतिम सामना होणार आहे. हा सामना 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : अक्षय वाडकर (कर्णधार आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, पार्थ रेखाडे, दानिश मलेवार, करुण नायर, यश राठोड, हर्ष दुबे, दर्शन नळकांडे, यश ठाकूर आणि नचिकेत भुते.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस.