Sreesanth: वादांमुळे लक्षात रहाणारा श्रीसंत हॉस्पिटलमध्ये दाखल, फोटो आला समोर

| Updated on: Mar 01, 2022 | 4:55 PM

भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला (S Sreesanth) गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

Sreesanth: वादांमुळे लक्षात रहाणारा श्रीसंत हॉस्पिटलमध्ये दाखल,  फोटो आला समोर
Follow us on

कोची: भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला (S Sreesanth) गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. रुग्णालयातील एस. श्रीसंतचा फोटो आता समोर आला आहे. श्रीसंतने IPL 2022 मेगा ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. पण त्याच्यामध्ये कुठल्याही फ्रेंचायजीने रस दाखवला नाही. त्यामुळे त्याचं नावही बोलीसाठी पुकारण्यात आलं नाही. आयपीएलमध्ये त्याने त्याची बेस प्राइस 50 लाख रुपये ठेवली होती. श्रीसंत हे नाव भारतात कुठल्या क्रिकेट चाहत्याला माहित नाही, असं होणार नाही. क्रिकेटपेक्षा (Cricket) वादांसाठीच श्रीसंतची कारकीर्द जास्त गाजली. स्पॉट फिक्सिंग, डान्स, राडे यासाठीच श्रीसंत जास्त लक्षात राहिला. श्रीसंतवर बंदी सुद्धा घालण्यात आली होती. कायदेशीर कारवाईतून सुटका झाल्यानंतर श्रीसंत आता मैदानावर परतला आहे. तो केरळसाठी रणजी करंडक सामन्यांमध्ये खेळतो.

दुखापत कितपत गंभीर

रणजीचा मोसम सुरु झाल्यानंतर श्रीसंत केरळसाठी पहिला रणजी सामना सुद्धा खेळला. पण दुसऱ्या सामन्याआधी सराव सत्रादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले असून पुढचे दोन आठवडे त्याला क्रिकेट खेळता येणार नाहीय. त्याचं डाव्या खांद्याचं हाड दुखावलं गेलं आहे.

एस.श्रीसंत भारताच्या टी 20 मधील पहिल्या आणि 2011 मधील वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता. श्रीसंतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधला फोटो शेअर केला आहे. त्यावर एक मेसेजही लिहिलेला आहे. 12-13 फेब्रुवारीला दोन दिवसांचे ऑक्शन संपल्यानंतर श्रीसंतने स्वत:चा उत्साह वाढवण्यासाठी गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. यात तो किशोर कुमारचं गाण गुणगुणत होता. ‘रुक जाना नही तू कही हारके’ असे त्या गाण्याचे बोल होते.

श्रीसंत सध्या केरळसाठी रणजीमध्ये खेळतोय. केरळने मेघायलया विरुद्धचा सामना डावाने जिंकला. यामध्ये श्रीसंतने 40 धावात दोन विकेट घेतल्या. दुसरा सामनाही केरळने आठ विकेटने जिंकला. केरळचा पुढचा सामना तीन मार्चपासून मध्य प्रदेश विरुद्ध होणार आहे.

आतापर्यंत किती विकेट काढल्या

श्रीसंत केरळकडून 2020/21 च्या सीजनमध्ये खेळला होता. श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोची टस्कर्स केरळकडून खेळला आहे. टी-20 स्पर्धेत 44 सामन्यात त्याने 40 विकेट घेतल्यात. 2007 च्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा श्रीसंत भाग होता. श्रीसंतने 10 टी-20 सामन्यात 7 विकेट काढल्या आहेत. 65 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 54 विकेट काढल्यात.

ranji trophy sreesanth injured admitted in hospital kerala