RCB vs MI Toss : मुंबई इंडियन्सची आरसीबी विरुद्ध बॅटिंग, पलटणचा प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय

Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Toss and Playing 11 : आरसीबीने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता मुंबईची पलटण गतविजेत्या संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RCB vs MI Toss : मुंबई इंडियन्सची आरसीबी विरुद्ध बॅटिंग, पलटणचा प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय
RCB vs MI Toss IPL 2026
Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 10, 2026 | 8:18 PM

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आज 10 मे रोजी डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला.  आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने टॉस जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेजिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि बंगळुरु दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आरसीबी 2021 पासून पलटणवर वरचढ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2021 पासून मुंबई इंडियन्सवर वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतंय. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 2021 पासून 8 सामने खेळवण्यात आले आहेत. आरसीबीने त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. तर मुंबई इंडियन्सला फक्त 2 वेळाच विजयी होता आलं आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

मुंबई विरुद्ध बंगळुरु यांच्यातील हा एकूण 36 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघात एकूण 35 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने या 35 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत.  मुंबईने 19 सामन्यांत विजय मिळवला आहे.  तर आरसीबीने 16 सामन्यांत मुंबईला पराभूत केलं आहे.

प्लेइंग ईलेव्हनबाबत निर्णय काय?

दरम्यान  आरसीबीला गेल्या 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. मात्र त्यानंतरही आरसीबीने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरसीबीने आपल्या त्याच 11 शिलेदारांवर विश्वास दाखवला आहे. तर मुंबईने सलग 3 पराभवानंतर गेल्या सामन्यात विजय मिळवला. मुंबईने या विजयानंतर त्याच प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईची ही प्लेइंग ईलेव्हन आरसीबीच्या गोलंदाजांसमोर किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गझनफर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा आणि रसिक सलाम दार.

Follow Us