
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात बेंचवर बसणंच पसंत केलं होतं. त्यानंतर फॉर्ममध्ये परतण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचं ठरवलं. रोहित शर्मा आता मुंबई संघाकडून रणजी स्पर्धेत खेळणार आहे. खराब फॉर्ममुळे त्याने असा निर्णय घेतला आहे. जवळपास दहा वर्षांनी रोहित शर्मा रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. पण या स्पर्धेत रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून असणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या संघात त्याचं नाव आहे. पण कर्णधार म्हणून नाही तर एक खेळाडू म्हणून..मुंबई क्रिकेट असोसिएशनने निवडलेल्या 17 खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आहे. पण मुंबई संघाची धुरा अनुभवी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर देण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रोहित शर्मा या स्पर्धेत खेळणार आहे. मुंबईचा पहिला सामना 23 जानेवारीपासून एमसीए-बीकेसी ग्राउंडवर होणआर आहे. जम्मू काश्मीरविरुद्ध हा सामना होणार आहे.
टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्माने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मा आता फक्त वनडे आणि कसोटी सामने खेळत आहे. त्यात कसोटीत त्याची कामगिरी आणि रेकॉर्ड एकदम खराब आहे. तर वनडे फॉर्मेटमध्ये त्याचं भविष्य चॅम्पियन्स ट्रॉफीवर अवलंबून असणार आहे. अशा स्थितीत रोहित शर्माला फॉर्मात परतणं खूपच गरजेचं आहे. त्यासाठी 23 जानेवारीपासून सुरु होणारा जम्मू काश्मीर विरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण रोहित शर्माला कसोटी खेळायचं आहे असंच दिसत आहे. यासाठी तो कठोर मेहनत घेत आहे. रणजी स्पर्धेत रोहित शर्मा 2015 मध्ये खेळला होता. मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश हा त्याचा शेवटचा सामन होता. त्यानंतर देशांतर्गत स्पर्धेत खेळला नाही.
जम्मू काश्मीरविरुद्ध रणजी स्पर्धेसाठी मुंबईचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार),रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), तनुश कोटियन, शम्स मुलानी, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, हर्ष कोठारी.