RR vs RCB Result IPL 2022: Dinesh Karthik ने अश्विनची गोलंदाजी फोडली, तिथेच सामना फिरला, RCB चा रोमांचक विजय

| Updated on: Apr 06, 2022 | 12:14 AM

RR vs RCB Result IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज एक रंगतदार सामना पहायला मिळाला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यामध्ये होते.

RR vs RCB Result IPL 2022: Dinesh Karthik ने अश्विनची गोलंदाजी फोडली, तिथेच सामना फिरला, RCB चा रोमांचक विजय
IPL 2022: दिनेश कार्तिक, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
Image Credit source: twitter
Follow us on

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज एक रंगतदार सामना पहायला मिळाला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यामध्ये होते. अभेद्य, अजिंक्य वाटणाऱ्या संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय (RR vs RCB) मिळवला. चांगल्या सुरुवातीनंतर RCB चा संघ एका टप्प्यावर सामना गमावतोय असं दिसतं होतं. पण अनुभव दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शाहबाज अहमदच्या साथीने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. टी 20 क्रिकेटमधली खरी रंगत या सामन्यामधून अनुभवता आली. टी 20 तुम्ही वेगवान सुरुवात करा किंवा धीमी. सामन्याचा नूर पालटण्यासाठी एक-दोन षटक पुरेशी असतात. तेच आजच्या सामन्यात घडलं. तत्पूर्वी आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं.

तिथूनच सामन्याच चित्र बदललं

राजस्थानने निर्धारीत 20 षटकात 169 धावा फटकावल्या. हे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने चार विकेट आणि पाच चेंडू राखून पार केलं. RCB ने हा सामना जिंकला तो, दिनेश कार्तिक नाबाद (44) आणि शाहबाज अहमद (45) यांच्या फलंदाजीमुळे. रविचंद्रन अश्विन टाकत असलेल्या 14 व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकने फटकेबाजी केली. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावत 21 धावा चोपल्या. तिथूनच सामन्याच चित्र बदललं.

RCB च्या सात धावात चार विकेट

RCB ने चांगली सुरुवात केली होती. फाफ डु प्लेसीस आणि अनुज रावतने 55 धावांची सलामी दिली होती. त्याचवेळी युजवेंद्र चहलने आपल्या फिरकी गोलंदाजीवर डु प्लेसीसला फसवलं. 29 धावांवर बोल्टकरवी झेलबाद केलं. अनुज रावतही सैनीच्या गोलंदाजीवर लगेच 26 धावांवर आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली पाच धावांवर रनआऊट झाला. पाठोपाठ डेविड विलीला चहलने बोल्ड केलं. एकवेळ चांगल्या स्थितीत असलेल्या RCB च्या सात धावात चार विकेट गेल्या.

आरसीबीचा विजय दृष्टीपथात होता

धावफलकावर 87 धावा असताना रुदरफोर्डची विकेट गेली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकने आधी रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर एका षटकात 21 धावा लुटल्या. नंतर दुसऱ्या गोलंदाजांना लक्ष्य केलं. शाहबाज अहमदने सुद्धा सुंदर फलंदाजी केली. त्याने 26 चेंडूत 45 धावा करताना चार चौकार आणि तीन षटकार मारले. दिनेश कार्तिकने 23 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी करताना सात चौकार आणि एक षटकार लगावला. सहाव्या विकेटसाठी दोघांनी 67 धावांची भागीदारी केली. शाहबाज अहमद आऊट झाला, त्यावेळी आरसीबीचा विजय दृष्टीपथात होता. यशस्वी जैस्वालच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून हर्षल पटेलने आरसीबीच्या दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.