
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी आता लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स लाखोंच्या घरात आहेत. ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच दैनदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी शेअर करत असते. विदेश दौरा असो की मित्रांसोबत पार्टी सर्वकाही शेअर करते. पण तिच्य़ा फिटनेससंबधी पोस्टचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. या क्षेत्रात साराने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता साराने त्या क्षेत्रात ठसा उमटवण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकर फाउंडेशनची संचालक असलेल्या साराने आता स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. यासाठी साराने पिलेट्स स्टुडिओ सुरु केला आहे. पिलेट्स अकादमीत फिटनेसचे धडे दिले जाणार आहे. शरीरिकदृष्ट्या कसं सक्षम राहता येईल यासाठी मार्गदर्शन दिलं जाणार आहे. या स्टुडिओचं उद्घाटन सचिन तेंडुलकरने श्रीफळ फोडून केलं. यावेळी अंजली तेंडलकर, साराची भावी वहिनी सानिया चंडोकही उपस्थित होती.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उद्घाटनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच एक भावुक पोस्ट लिहिली आहे. “पालक म्हणून, तुम्ही नेहमीच अशी आशा करता की तुमच्या मुलांनी त्यांना आवडणारे काहीतरी करावे. साराला पिलेट्स स्टुडिओ उघडताना पाहणे हा असाच एक क्षण आहे ज्यामुळे आम्ही आनंदाने भारावून गेलो आहोत.”
As a parent, you always hope your children find something they truly love doing. Watching Sara open a Pilates studio has been one of those moments that fills our hearts.
She has built this journey with her own hard work and belief, brick by brick.
Nutrition and movement have… pic.twitter.com/lpRYj6mXer
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 22, 2025
सचिन तेंडुलकर इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुढे लिहिलं की, “साराने हा संपूर्ण प्रवास तिच्या कठोर परिश्रम आणि विश्वासाने पूर्ण केला आहे. पोषण आणि चालणं फिरणं नेहमीच आमच्या जीवनाचा एक भाग राहिला आहे आणि सारा तिच्या पद्धतीने हा विचार पुढे नेत आहे हे पाहणे खूप खास आहे. सारा, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. या नवीन सुरुवातीबद्दल अभिनंदन.”
साराच्या पिलेट्स स्टुडिओच्या उद्घाटन प्रसंगी सानिया चंडोकही उपस्थित होती. तिने साराला या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिलं. सानिया ही साराची मैत्रिण आणि भावी वहिनी आहे. काही दिवसांपूर्वी सानिया आणि अर्जुनचा साखरपुडा पार पडला. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणारा आहे. तत्पूर्वी सानिया तेंडुलकर कुटुंबियांसोबत दिसली.