टी20 वर्ल्डकपसाठी स्कॉटलंडचा संघ जाहीर, अफगाणिस्तानात जन्मलेल्या खेळाडूला दिली संधी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना स्कॉटलँडची अचानक स्पर्धेत एन्ट्री झाली. बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडला जागा मिळाली आहे. असं असताना स्कॉटलँडने संघाची घोषणा केली आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी स्कॉटलंडचा संघ जाहीर, अफगाणिस्तानात जन्मलेल्या खेळाडूला दिली संधी
टी20 वर्ल्डकपसाठी स्कॉटलंडचा संघ जाहीर, अफगाणिस्तानात जन्मलेल्या खेळाडूला दिली संधी
Image Credit source: Scotland Cricket Twitter
| Updated on: Jan 27, 2026 | 8:14 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहे. तर बांगलादेशने वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर तसाच अट्टाहास धरला होता. पण वेळापत्रकात बदल करणं कठीण असल्याचं आयसीसीने सांगितलं. तरीही बांग्लादेश क्रिकेट बोर्ड या मागणीवर ठाम राहिलं. त्यामुळे आयसीसीने बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवला आणि स्कॉटलँडला स्पर्धेत एन्ट्री दिली. ऐनवेळी स्कॉटलँडला स्पर्धेत जागा मिळाल्याने संघाची बांधणी करण्यास खूपच कमी वेळ होता. पण स्कॉटलँडने कमी वेळात संघाची घोषणा करून स्पर्धेसाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. स्कॉटलँड संघाची धुरा अनुभवी अष्टपैलू रिची बेरिंग्टनकडे सोपवण्यात आली आहे. 38 वर्षीय रिची बेरिंग्टन 100हून अधिक टी20 सामने खेळला आहे. तसेच त्याच्या नावावर 2 हजाराहून अधिक धावा आहेत. विशेष म्हणजे या संघात निवड झालेल्या खेळाडूंपैकी 11 खेळाडू हे मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळले आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याबाबत स्कॉटलँडची काही पूर्वतयारी नव्हती. मागच्या महिन्यातच स्कॉटलँड व्यवस्थापनात काही उलथापालथी झाल्या आहेत. मुख्य प्रशिक्षक म्हणून ओवेन डॉकिन्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक ओवेन डॉकिन्स म्हणाले की, इतक्या कमी वेळेत तयारी करणे आव्हानात्मक असले तरी, संघात मोठ्या मंचावर प्रभाव पाडण्यास सक्षम खेळाडू आहेत. स्कॉटलंडचा संघ भारतातील या स्पर्धेत जोरदार कामगिरी करण्यास पूर्णपणे सज्ज आहे. स्कॉटलँड संघात जानूल्लाह एहसानला संधी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानात जन्मलेला हा वेगवान गोलंदाज अलीकडेच स्कॉटलंडकडून खेळण्यासाठी पात्र ठरला होता. टॉम ब्रूस, फिनले मॅकक्रिथ आणि ऑलिव्हर डेव्हिडसन हे पहिल्यांदाच वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतात येणार आहेत.

ऐनवेळी स्कॉटलँडला वर्ल्डकप स्पर्धेत संधी मिळाल्याने दोन प्रवासी राखीव आणि तीन नॉन ट्रॅव्हलिंग राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मोक्याच्या क्षणी काही दुखापत वगैरे झाल्यास या खेळाडूंना संधी दिली जाईल.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी स्कॉटलँडचा संघ : रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, ऑलिव्हर डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्हज, झैनुल्लाह एहसान, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, फिनले मॅकक्रीथ, ब्रेंडन मॅकमुलेन कॉर्स्टोर्फिन, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, मार्क वॅट, ब्रॅडली व्हील.

प्रवासी राखीव जागा: जास्पर डेव्हिडसन, जॅक जार्विस

प्रवास न करणारे राखीव: मॅकेन्झी जोन्स, ख्रिस मॅकब्राइड, चार्ली टीअर