
भारतीय फलंदाजांसाठी यावेळी कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणारा पहिला कसोटी सामना काही विशेष ठरला नाही. भारताचे बहुतेक फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत, पण हा सामना एका फलंदाजासाठी यादगार ठरणार आहे. या खेळाडूचे नाव आहे श्रेयस अय्यर. अय्यरने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या शानदार फलंदाजीने एका अनोख्या क्लबमध्ये प्रवेश केला.

या सामन्याच्या पहिल्या डावात अय्यरने शतक झळकावले आणि पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा 16 वा फलंदाज ठरला. अय्यरने दुसऱ्या डावात पुन्हा चमत्कार केला आणि अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात त्याने 65 धावा केल्या. यासह, पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे.


पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 50 पेक्षा जास्त धावा करणारे सुनील गावसकर हे भारताचा दुसरे फलंदाज आहेत. 1970-71 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजच्या धोकादायक गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध गावसकर यांनी चांगली फलंदाजी केली होती. गावस्कर यांनी पहिल्या डावात 65 आणि दुसऱ्या डावात नाबाद 67 धावा फटकावल्या होत्या.

पहिल्या डावात शतक झळकावल्यामुळे अय्यर मात्र या दोघांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात 50 हून अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. एकूणच या बाबतीत अय्यर जगातला 10 वा फलंदाज आहे.