
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील वनडे मालिका संपल्यानंतर 9 डिसेंबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पाच सामन्यांची टी20 मालिका टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ फक्त दोन टी20 मालिका खेळणार आहे. दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकेतील फॉर्मात असलेल्या खेळाडूंची टी20 वर्ल्डकपसाठी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही मालिका खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू सज्ज आहे. नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सूर्यकुमार यादवनंतर उपकर्णधारपदाची धुरा शुबमन गिलकडे दिली होती. मात्र सध्या दुखापतीने त्रस्त असून कसोटीनंतर वनडे मालिकेला मुकला आहे. आता टी20 मालिकेत खेळणार की नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. शुबमन गिलच्या गैरहजेरीत पहिल्या कसोटीत टीम इंडियाला 10 फलंदाजांसह खेळावं लागलं होतं. हा सामना भारताने 30 धावांनी गमावला होता. इतकंच काय नंतर या मालिकेत गणित बिघडलं आणि मालिका 2-0 ने गमवावी लागली.
मिडिया रिपोर्टनुसार, शुबमन गिल बीसीसीआयच्या बंगळुरुस्थित सेंटर ऑफ एक्सिलेंस रिहॅबमध्ये दाखल झाला आहे. येथे काही चाचण्या झाल्यानंतर टी20 मालिकेसाठी तंदुरूस्त आहे की नाही ते निश्चित केलं जाईल. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, शुबमन गिल टी20 मालिकेत खेळण्याची 50टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. पण या मालिकेसाठी पूर्णपणे फिट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याचं खेळणं कठीण आहे. अजूनही टीम इंडियाने टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे उपकर्णधार शुबमन गिलच्या फिटनेस रिपोर्टकडे निवडकर्त्यांचं लक्ष लागून आहे.
पीटीआयच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या आधारे सांगण्यात आलं होतं की, ‘गिलला इंजेक्शन देण्यात आले होते तेव्हा त्याला 21 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. इतकंच काय रिहॅबचा सल्लाही दिला होता. स्पोर्ट्स सायंस टीम त्याची ट्रेनिंग घेण्यापूर्वी त्याची फिटनेस टेस्ट करेल. स्पोर्ट्स सायन्स टीम प्रशिक्षणादरम्यान त्याच्या हालचाली आणि कौशल्यांचे मूल्यांकन करत नाही. फलंदाजी करताना त्याला काही अस्वस्थता येत आहे का हे पाहत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.’