टी20 सामन्यात ट्वीस्ट! शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज; दुसरी धाव घेताच गडबड, पंचांनी दिला असा निर्णय
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने हे धाकधूक वाढवणारे असतात. शेवटच्या चेंडूवर काय होईल सांगता येत नाही. असंच काहीसं वुमन्स दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेच्या एका सामन्यात घडलं. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावांची गरज असताना गडबड झाली.

क्रिकेटविश्वात अनेक विक्रम मोडले आणि रचले जातात. त्यात काही नवीन नाही. पण काही घटना या पहिल्यांदाच घडल्या की आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. असंच काहीसं वुमन्स दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत झालं. या स्पर्धेतील 11व्या सामन्यात नॉर्थ दिल्ली सुपरस्ट्राइकर्स आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना 1 सप्टेंबर रोजी पार पडला आणि धाकधूक वाढवणारा ठरला. या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला होता. खरं तर हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल असं वाटलं होतं. पण नेमका तेव्हाच ट्वीस्ट आला. तीन धावांचा प्रयत्न असताना फलंदाजला ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड आऊट दिलं गेलं. त्यामुळे हा सामना नॉर्थ दिल्ली सुपर सुपरस्ट्राइकर्स यांच्या पारड्यात पडला.
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत नॉर्थ दिल्ली सुपर स्ट्राईकर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 126 धावा केल्या. तसेच विजयासाठी 127 धावांचं लक्ष्य ठेवलं. आता हे लक्ष्य गाठताना साउथ दिल्ली सुपरस्टार्सने 19.5 षटकात 6 गडी गमवून 123 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती. या चेंडूचा सामना करण्यासाठी श्वेता सेहरावत समोर होती. तर गोलंदाजीसाठी रेशिका बेनिवाल होती. त्यामुळे या चेंडूवर काय होते याची उत्सुकता होती. श्वेता सेहरावतने चेंडूवर जोरदार प्रहार केला आणि कशाही करून तीन धावा घेण्याचा प्रयत्न केला. कारण तीन धावा घेतल्या तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता.
शेवटच्या चेंडूवर फलंदाजांनी पहिली धाव वेगाने पूर्ण केली आणि मॅच टाय करण्यासाठी दुसऱ्या व तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू केले. पण क्षेत्ररक्षकाने थ्रो केला आणि धाव पूर्ण करताना कर्णधार श्वेता सेहरावत ही चेंडूच्या मध्ये आली. नॉर्थ दिल्लीच्या संघाने यावर जोरदार अपील केले. पंचांनी हा निर्णय पडताळण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे पाठवला. टीव्ही रिप्लेमध्ये वेगवेगळ्या अँगलने पाहिल्यानंतर श्वेताने चेंडूची दिशा पाहून जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पंचांनी तिला बाद दिलं. यामुळे हा सामना साउथ दिल्ली सुपरस्टार्सने 2 धावांनी गमावला.
पराभूत होऊनही अंतिम फेरी गाठली
साउथ दिल्ली सुपरस्टार्सने हा सामना गमावला असला तरी अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. दुसरीकडे नॉर्थ दिल्ली सुपरस्ट्राईकर्सने विजयासह अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पुन्हा एकदा भिडणार आहे. साउथ दिल्ली सुपरस्टार्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठल्याने अंतिम फेरीचं तिकीट मिळालं आहे.