SL vs NZ : दिनेशचं शतक, अँजलो-कामिंदूची नाबाद अर्धशतकं, श्रीलंकेच्या पहिल्या दिवशी 306 धावा

Sri Lanka vs New Zealand 2nd Test Day 1 Stumps Highlights In Marathi : यजमान श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवस आपल्या नावावर केला आहे. लंकेने 300 पार मजल मारत न्यूझीलंडला बॅकफुटवर ढकललं आहे.

SL vs NZ : दिनेशचं शतक, अँजलो-कामिंदूची नाबाद अर्धशतकं, श्रीलंकेच्या पहिल्या दिवशी 306 धावा
Angelo Mathews and Kamindu Mendis
Image Credit source: sri lanka cricket x account
| Updated on: Sep 26, 2024 | 6:29 PM

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. श्रीलंकेने पहिला दिवस आपल्या नावावर केला. श्रीलंकेने टॉस जिंकून पहिल्या डावात खेळसंपेपर्यंत 300 पार मजल मारली. श्रीलंकेने 90 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 306 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिनेश चांदीमल याने शतकी खेळी केली. तर पाथुम निसांका याने 1 तर दिमुथ करुणारत्ने याने 46 धावा केल्या. तर अँजलो मॅथ्यू आणि कामिंदू मेंडीस ही जोडी वैयक्तिक अर्धशतकं झळकावून नाबाद परतली. न्यूझीलंडकडून कॅप्टन टीम साऊथी आणि ग्लेन फीलिप्स या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

श्रीलंकेला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. श्रीलंकेने 2 धावा असताना पहिली विकेट गमावली. पाथुम निसांका याला कॅप्टन टीम साऊथी याने 1 धावेवर टॉम ब्लंडेल याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर दिमुथ आणि दिनेश चांदीमल या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. ग्लेन फिलीप्स आणि टॉम लॅथम या जोडीने ही जोडी फोडली. दिमुथ करुणारत्ने 46 धावांवर रन आऊट झाला. त्यांनतर तिसऱ्या विकेटसाठी दिनेश चांदीमल आणि अँजलो मॅथ्यूज या अनुभवी जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. दिनेश चांदीमलने या भागीदारी दरम्यान 16 वं कसोटी शतक पूर्ण केलं. दिनेशला ही खेळीचं मोठ्या आकड्यात बदलण्याची संधी होती. मात्र दिनेश शतकानंतर 16 धावा करुन आऊट झाला. दिनेशने 208 चेंडूंमध्ये 16 चौकारांच्या मदतीने 116 धावांची खेळी केली.

त्यानंतर कामिंदु मेंडीस आणि अँजलो मॅथ्यूज जोडी मैदानात घट्ट पाय रोवून उभी राहिली. या दोघांनी खेळ संपेपर्यंत विकेट गमावली नाही. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 87 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. मॅथ्यूजने 166 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 78 धावा केल्या आहेत. तर कामिंदु मेंडीस याने 56 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 8 फोरसह नॉट आऊट 51 रन्स केल्या आहेत. कामिंदुचं हे आठवं कसोटी अर्धशतक ठरलं आहे. आता ही जोडी दुसऱ्या दिवशी कशी सुरुवात करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

पहिला दिवस श्रीलंकेचा

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो.