मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा मास्टरस्ट्रोक, जागावाटपाचा सिक्रेट प्लॅन समोर
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात महायुती निश्चित झाली आहे. मुंबईसह प्रमुख महानगरांमध्ये ही युती कायम राहील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली.

सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची महायुती निश्चित झाली आहे. मुंबईसह प्रमुख महानगरांमध्ये ही युती कायम राहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. लोकहित आणि सकारात्मक राजकीय संदेश देण्यासाठी युती होणे गरजेचे असल्याचे मत वरिष्ठांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या अन्य प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर गुरुवारी पुन्हा एकदा या सर्व नेत्यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि भाजपचे प्रमुख नेते यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित आणि आगामी निवडणुका कशाप्रकारे लढवायच्या, यावर सखोल रणनीतीविषयक चर्चा झाली. यात विशेषतः २९ महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
यावेळी सर्व वरिष्ठांनी मुंबई व प्रमुख महापालिकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत युती व्हायलाच हवी, असे मत ठामपणे मांडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, असेही मत यावेळी मांडण्यात आले.
युतीचा नेमका फॉर्म्युला कसा असणार?
मुंबई आणि इतर प्रमुख महापालिकांमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे. उर्वरित महापालिकांमध्ये युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी कमिटी तयार करून चर्चा करणार आहे. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कमिटी तयार करून सकारात्मक दिशेने चाचपणी करण्यासाठी विचार सुरू करण्यात आला आहे. ही समिती त्या-त्या ठिकाणच्या युतीचा नेमका फॉर्म्युला कसा असावा, याबद्दल चर्चा करून निर्णय घेईल, असे रविंद्र चव्हाण यांनी म्हटले.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून पुढे जाण्याचा दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक आणि लोकहिताचा संदेश जाणे गरजेचे आहे, याच उद्देशाने युतीचे हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
