NZ vs SL : प्रभाथ जयसूर्याने गुंडाळलं, न्यूझीलंड 602 समोर 88 धावांवर ढेर, श्रीलंकेकडून फॉलोऑन

Sri Lanka vs New Zealand 2nd Test: प्रभाथ जयसूर्या याच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडने गुडघे टेकले. न्यूझीलंडचा पहिला डाव 602 धावांच्या प्रत्युत्तरात 88 धावांवर आटोपला.

NZ vs SL : प्रभाथ जयसूर्याने गुंडाळलं, न्यूझीलंड 602 समोर 88 धावांवर ढेर, श्रीलंकेकडून फॉलोऑन
prabath jaysuriay sl vs nz 2nd test
Image Credit source: sri lanka cricket x account
| Updated on: Sep 28, 2024 | 1:22 PM

श्रीलंकेने न्यूझीलंडला दुसऱ्या आणि अंतिम कसोटीतील तिसऱ्या दिवशी 88 धावांवर ढेर केलं आहे. श्रीलंकेने यासह 514 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडला श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 602 धावांच्या प्रत्युत्तरात 88 पर्यंतच पोहचता आलं. न्यूझीलंडने तिसऱ्या दिवशी अवघ्या 66 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 22 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून प्रभाथ जयसूर्या याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. जयसूर्याची कसोटीत 5 विकेट्स घेण्याची ही आठवी वेळ ठरली. डेब्यूटंट निशान पेरीस याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर असिथा फर्नांडो याने 1 विकेट घेत दोघांना चांगली साथ दिली. आता श्रीलंकेने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावातील पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पहिली विकेट गमावली. न्यूझीलंडने शून्यवर टॉम लॅथमच्या रुपात पहिली विकेट गमावली आहे. हा सामना गॉल येथे खेळवण्यात येत आहे.

न्यूझीलंडची बॅटिंग

न्यूझीलंडकडून पहिल्या डावात फक्त तिघांनाचा दुहेरी आकडा गाठता आला. मिचेल सँटनर याने सर्वाधिक 29 धावा केल्या. तर डॅरेल मिचेलने 13 आणि रचीन रवींद्रने 10 धावांचं योगदान दिलं. विलियम ओरुर्रके 2 धावांवर नाबाद परतला. तर इतरांनाही श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.

श्रीलंकेची दुसरी वेळ

श्रीलंकेची कसोटी क्रिकेटमध्ये 500 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवण्याची दुसरी वेळ ठरली आहे. श्रीलंकेने याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2006 साली 587 धावांनी आघाडी मिळवली होती. कसोटीतील पहिल्या डावात सर्वाधिक धावांची आघाडी घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने 1938 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 702 धावांची आघाडी घेतली होती.

श्रीलंकेने न्यूझीलंडला गुंडाळलं

श्रीलंकेचा पहिला डाव

दरम्यान श्रीलंकेने पहिला डाव हा 163.4 षटकांमध्ये 5 बाद 602 धावांवर घोषित केला. श्रीलंकेकडून कामिंदू मेंडीस याने सर्वाधिक नाबाद 182 धावांची खेळी केली. कुसल मेंडीस याने नॉट आऊट 106 रन्स केल्या. तर दिनेश चांदीमल याने 116 धावांचं योगदान दिलं. अँजेलो मॅथ्यूजने 88 धावांची खेळी केली. दिमुथ करुणारत्ने याने 46 आणि कॅप्टन धनंजया डी सिल्वा याने 44 धावा जोडल्या. तर पाथुम निसांका याने 1 धाव केली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर कॅप्टन टीम साऊथी याने 1 विकेट घेतली.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभाथ जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो