
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेदरम्यान दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी संघ निवडला आहे. या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला स्थान मिळालं नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण कसोटी आणि वनडे मालिकेत टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत असल्याचं दिसून आलं आहे. अशा स्थितीत मोहम्मद शमीला वगळणं क्रीडाप्रेमींना रूचलं नाही. निवड समितीने पुन्हा एकदा मोहम्मद शमीकडे कानाडोळा केल्याची ओरड होत आहे. पण असं होत असताना मोहम्मद शमीने आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बंगाल आणि सर्व्हिसेस यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात बंगालने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सर्व्हिसेसने 18.2 षटकात सर्व गडी गमवून 165 धावा केल्या. यात सर्व्हिसेस रोखण्यात मोहम्मद शमीचं मोठं योगदान आहे. कारण त्याने 3.2 षटकात 13 धावा देत 4 गडी बाद केले.
मोहम्मद शमीच्या हातात चेंडू सोपवल्यानंतर त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत आपला आक्रमक बाणा दाखवून दिला. सलामीला आलेल्या गौरव कोचरला खातंच खोलू दिलं नाही. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने दुसरा ओपनर रवि चौहानला 26 धावांवर असताना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये त्याने आणखी विकेट घेतल्या. यासह मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली. त्यामुळे मोहम्मद शमीला टीम इंडियात स्थान मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण कसोटी आणि वनडेत भारताच्या गोलंदाजांनी निराशा केली.
मोहम्मद शमी या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला होता. तेव्हापासून संघात पदार्पणासाठी धडपड करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहे. पण त्याला संघात काही स्थान मिळत नाही. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला. तेव्हाही त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याला डावलण्यात आलं . वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याचा विचार केला गेला नाही. वारंवार डावललं जात असल्याने मोहम्मद शमीने नाराजी व्यक्त केली होती. पण त्याच्या नाराजीनंतरही त्याला काही संघात स्थान मिळताना दिसत नाही. कदाचित आता थेट न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विचार केला जाऊ शकतो.