
भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 साठी अंतिम फेरीतील दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. मध्य प्रदेशने उपांत्य फेरीती दुसऱ्या सामन्यात दिल्लीवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने एमपीला विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं होतं. एमपीने हे आव्हान 15.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. त्याआधी उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात मुंबईने बडोदावर 6 विकेट्सने मात केली.त्यामुळे आता रविवारी 15 डिसेंबरला मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात महाअंतिम सामना होणार आहे.
मध्य प्रदेशला विजयी धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर झटका लागला. अरपित गौड गोल्डन डक ठरला. त्यानंतर एमपीने 20 धावांवर दुसरी आणि 46 धावांवर तिसरी विकेट गमावली. सुभ्रांषू सेनापती 7 तर हर्षल गवळी याने 30 धावा केल्या. त्यानंतर हरप्रीत सिंह भाटीया आणि कॅप्टन रजत पाटीदार या जोडीने चौथ्या विकेटसाठी 106 धावांची नाबाद आणि विजयी भागादीर केली. हरप्रीतने 38 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 46 रन्स केल्या. तर रजत पाटीदार याने 6 सिक्स आणि 4 फोरसह 29 बॉलमध्ये 66 धावांची स्फोटक खेळी केली. दिल्लीकडून इशांत शर्मा याने 2 विकेट्स मिळवल्या. तर हिमांशु चौहान याने 1 विकेट घेतली.
रजत पाटीदारची स्फोटक खेळी
RAJAT PATIDAR 66(29) 4×4 6×6
MP Qualified into finals 🔥 pic.twitter.com/i7lmlwH88R— Vinay (@Koxassassin) December 13, 2024
त्याआधी दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 146 धावा केल्या. दिल्लीसाठी विकेटकीपर बॅट्समन अनुज रावत याने सर्वाधिक 33 धावा केल्या. ओपनर प्रियांश आर्या याने 29 तर मयंक रावतने 24 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना 20 पारही पोहचता आलं नाही. एमपीकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर आवेश खान, त्रिपुरेश सिंग आणि कुमार कार्तिकेय या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दिल्ली प्लेइंग इलेव्हन : आयुष बडोनी (कर्णधार), प्रियांश आर्य, यश धुल, अनुज रावत (विकेटकीपर), हिम्मत सिंग, हर्ष त्यागी, मयंक रावत, हिमांशू चौहान, सुयश शर्मा, प्रिन्स यादव आणि इशांत शर्मा.
मध्य प्रदेश प्लेइंग इलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), अर्पित गौड, हर्ष गवळी (विकेटकीपर), सुभ्रांशु सेनापती, व्यंकटेश अय्यर, हरप्रीत सिंग भाटिया, त्रिपुरेश सिंग, राहुल बाथम, कुमार कार्तिकेय, आवेश खान आणि शिवम शुक्ला.