
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कसोटी क्रिकेटला रामराम केला. त्यानंतर आता अवघ्या काही तासांच्या अंतराने 2 दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तर त्यानंतर आता काही तासांनी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन हेन्रिक क्लासेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हेन्रिक क्लासेन याने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
हेन्रिक क्लासेन याने इंस्टाग्रामवर कुटुंबासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनल सामन्यानंतरचा आहे. हेन्रिकने हा फोटो पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जात असल्याचं सांगितलं. “देशाचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी गौरवाची बाब राहिली. देशासाठी खेळायचं हे स्वप्न मी लहानपणापासून पाहत होतो”, असं क्लासेनने म्हटलंय. या शानदार क्रिकेट कारकीर्दीत मला अशी काही माणसं भेटली, ज्यामुळे माझं आयुष्य बदललं, असंही क्लासेनने नमूद केलं.
क्लासेनने त्याच्या निवृत्तीचं कारणही चाहत्यांना सांगितलं. “मी आता आशा करतो की कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवू शकतो”, असं क्लासेन म्हणाला. तसेच क्लासेनने त्याला इथवर पोहचण्यापर्यंत मदत करणाऱ्या सर्वांचे आभारही मानले.
क्लासेनने गेल्या वर्षी अर्थात जानेवारी 2024 मध्ये कसोटी क्रिकेटला रामराम केला होता. क्लासेनने 4 कसोटी सामन्यांमध्ये 104 धावा केल्या. तर आता क्लासेनने वनडे आणि टी 20i फॉर्मटेला बायबाय केला आहे. क्लासेनने 60 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 हजार 141 धावा केल्या. क्लासेनने या दरम्यान 4 शतकं आणि 11 अर्धशतकं झळाकवली. तसेच क्लासेनने 58 टी 20 सामन्यांमध्ये 1 हजार धावा केल्या.
क्लासेनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
🚨 𝑩𝑹𝑬𝑨𝑲𝑰𝑵𝑮 🚨
South African wicketkeeper-batter Heinrich Klaasen has announced his retirement from international cricket at the age of 33, after featuring in 122 matches. 🇿🇦🤝
He scored 2,141 ODI runs, 1,000 T20I runs, and 104 Test runs, including 4 international… pic.twitter.com/EoNUt7YFEv
— Sportskeeda (@Sportskeeda) June 2, 2025
दरम्यान क्लासेनने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील शेवटचा सामना हा नुकताच आयपीएल 2025 मध्ये खेळला. क्लासेन सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व करत होता. क्लासेनने हैदराबादच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 105 धावांची खेळी केली. क्लासेनने त्याच्या आयपीएल करियरमध्ये 49 सामन्यांमध्ये 7 अर्धशतकं आणि 2 शतकांच्या मदतीने 1 हजार 480 धावा केल्या. क्लासेनने लीग क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचंही स्पष्ट केलं.