IPL vs PSL : आयपीएलशी स्पर्धा करताना पाकिस्तानचा फुसका बार, तिसऱ्या सामन्यातच पितळ पडलं उघडं

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयपीएलला स्पर्धा करत पीएसएल सुरु केली आहे. यंदा स्पर्धेचं दहावं पर्व आहे. आयपीएलशी स्पर्धा करताना यावेळी त्यांनी तारखाही तशाच ठेवल्या आहेत. स्थानिक खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू रिंगणात आहेत. पण असं असूनही पाकिस्तान सुपर लीगची नाचक्की झाली आहे.

IPL vs PSL : आयपीएलशी स्पर्धा करताना पाकिस्तानचा फुसका बार, तिसऱ्या सामन्यातच पितळ पडलं उघडं
पाकिस्तान सुपर लीग
Image Credit source: टीव्ही 9 तेलुगू
| Updated on: Apr 15, 2025 | 3:57 PM

आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीगपैकी एक आहे. या लीगमध्ये संधी मिळाली खेळाडूंची चांदी होते. पैशांचा वर्षाव होत असल्याने आर्थिक गणितं सुटून जातात. पण या लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना नो एन्ट्री आहे. दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने भारताने शेजारी राष्ट्राशी नातं तोडलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्यात आर्थिक संकटातही अडकले असून कर्जबाजारी देश म्हणून ठपका लागला आहे. असं असताना कुरापती काही कमी होत नाही. इंडियन प्रीमियर लीग आणि खासकरून विदेशी खेळाडूंची कोंडी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक प्रयत्न केला. पण या प्रयत्नात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्याच असं की पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या 10 व्या पर्वात पाच सामने पार पडले. पण तिसऱ्या सामन्यातच पाकिस्तानच्या सुपर लीग हवा निघाल्याचं दिसून आलं.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत 11 एप्रिलला तिसरा सामना कराची किंग्स आणि मुलतान सुल्तान्स यांच्यात रंगला. हा सामना कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाला. दोन्ही संघांनी जोरदार धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात 450 हून अधिक धावा झाल्या. पण हा सामना पाहण्यासाठी मैदानात फक्त 5000 क्रीडाप्रेमी होते. म्हणजे या सुपर लीगची लोकप्रियता गेली आहे असंच म्हणावं लागेल. मोहम्मद रिझवान, डेव्हिड वॉर्नर, हसन अली, टिम सेफर्ट आणि जेम्स विन्स सारखे स्टार खेळाडू असूनही प्रेक्षकांनी या सामन्याकडे पाठ फिरवली.

सुपर लीग स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यासाठी स्टेडियमच्या आत आणि आजूबाजूला प्रेक्षकांपेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी असल्याचं समोर आलं आह. एका पाकिस्तानी पत्रकाराने सुपर लीगचं पितळ उघडं पाडलं. त्याने सांगितलं की, हा सामना पाहण्यासाठी फक्त 5 हजार प्रेक्षक उपस्थित होते. पण सामन्यासाठी 6700 सुरक्षा कर्मचारी तैनात होते.पीएसएल सामन्यांसाठी प्रेक्षकांची कमतरता जाणवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असंच चित्र पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षात स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेट पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. फक्त पीएसएलमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अशीच स्थिती आहे. अनेकदा स्टेडियम रिकामी असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आयसीसीलाही स्पर्धेसाठी तिकीटाचे दर कमी करण्याची वेळ आहे. इ्ंग्लंड क्रिकेटनेही मैदानात प्रेक्षकांची संख्या वाढावी म्हणून तिकीटावर विराट कोहलीचा फोटो छापला आहे. आता पाहूयात मैदानात प्रेक्षक वर्ग येतो की नाही. दुसरीकडे, आयपीएलमध्ये मात्र प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक आहे.