
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी आतापर्यंत 8 पैकी 6 संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर यजमान यूएई आणि श्रीलंकेने संघ जाहीर केलेला नाही. यूएई आशिया कपआधी टी 20 ट्राय सीरिजमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका आशिया कपआधी झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका होणार आहे. उभयसंघात 2 एकदिवसीय आणि 3 टी 20i सामने होणार आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय मालिकेनंतर टी 20i सीरिजसाठी टीम जाहीर केली आहे.
श्रीलंकेने टी 20i मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंका क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. चरिथ असलंका हाच एकदिवसीय आणि टी 20i संघाचं नेतृत्व करणार आहे.
निवड समिताने 2 सामन्यांच्या एकदिवससीय मालिकेसाठी संघ जाहीर केला होता. तेव्हा मोहम्मद शिराज याला संधी दिली नव्हती. तसेच आताही निवड समितीने शिराजचा टी 20i मालिकेसाठी विचार केलेला नाही. त्यामुळे मोहम्मद शिराजला आणखी काही आठवडे प्रतिक्षा करावी लागणार आहे.
झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर 3 ते 7 सप्टेंबर दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे.
पहिला सामना, 3 सप्टेंबर, हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा सामना, 6 सप्टेंबर, हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा सामना, 7 सप्टेंबर, हरारे स्पोर्ट्स क्लब
झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडीस, कुसल परेरा, नाविंदु फर्नांडो, कामेंदु मेंडीस, कामिल मिसारा, विशेल हलमबागे, दासुन शनाका, दुनिथ वेलालगे, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, दुष्मंता हेमंथा, दुष्मंता चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुआन तुषारा आणि मथीशा पथिराना.
दरम्यान श्रीलंकेच्या खेळाडूंसाठी ही निर्णायक मालिका असणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आशिया कपसाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे निवड समिती या मालिकेनंतरच आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करु शकते. या मालिकेत दमदार कामगिरी खेळाडूंना आशिया कपसाठी संघात स्थान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा धमाकेदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.