
टीम इंडियाचे अनुभवी आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटला रामराम करत चाहत्यांना झटका दिला. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिग्ग्ज ऑलराउंडरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे टीमला मोठा झटका लागला आहे. श्रीलंकेचा अनुभवी बॅटिंग ऑलराउंडर अँजेलो मॅथ्यूज याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे, अँजलोने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बांगलादेश क्रिकेट टीम जून महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. अँजलो मॅथ्यूज या मालिकेतील पहिला सामना खेळून निवृत्त होणार आहे. तसेच व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचंही अँजलोने स्पष्ट केलं आहे.
“मला वाटतं की आता आमच्या कसोटी संघात अनुभवी आणि युवा खेळाडू आहेत. तसेच नव्या खेळाडूंकडे त्यांची प्रतिभा दाखवून देण्याची संधी आहे. माझ्यासाठी टेस्ट क्रिकेट सर्वात आवडता प्रकार आहे. मात्र आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. श्रीलंकेसाठी गेली 17 वर्ष कसोटी क्रिकेट खेळणं माझ्यासाठी सन्मानाची आणि गौरवाची बाब आहे”, असं अँजलोने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.
अँजेलो मॅथ्यूज टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
— Angelo Mathews (@Angelo69Mathews) May 23, 2025
अँजेलो मॅथ्यूज याने 4 जुलै 2009 रोजी पाकिस्तान विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 6 फेब्रुवारी 2025 रोजी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. अँजेलो मॅथ्यूज याने या दरम्यान एकूण 16 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत श्रीलंकेचं 118 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. अँजलोने 48.46 च्या स्ट्राईक रेटने आणि 44.63 या सरासरीने एकूण 8 हजार 167 धावा केल्या. अँजलोने कसोटी क्रिकेटमध्ये 1 द्विशतक, 16 शतकं आणि 45 अर्धशतकं झळकावली. तसेच अँजलोने 86 डावात बॉलिंग करताना एकूण 33 विकेट्स मिळवल्या.
अँजलो मॅथ्यूजने श्रीलंकेचं 226 एकदिवसीय आणि 90 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. अँजलोने वनडेत 3 शतकं आणि 40 अर्धशतकांसह 5 हजार 916 रन्स केल्या आहेत. तसेच 163 डावांत 126 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अँजलोने टी 20iमध्ये 6 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 416 रन्स केल्या आहेत. तर 72 डावांमध्ये 45 विकेट्स मिळवल्या आहेत.