IND vs SL: जसप्रीत बुमराह ग्रेट गोलंदाज? फलंदाज त्याला इतके का घाबरतात? वाचा सुनील गावस्करांचं अचूक विश्लेषण

IND vs SL: श्रीलंकेच्या फलंदाजांकडे बुमराहच्या गोलंदाजीचं कुठलही उत्तर नव्हतं. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक करताना तो एक यशस्वी गोलंदाज असल्याचं म्हटलं आहे. रविवारी दुसऱ्यादिवशी भारताने फक्त 35 चेंडूत श्रीलंकेचा पहिला डाव संपवला.

IND vs SL: जसप्रीत बुमराह ग्रेट गोलंदाज? फलंदाज त्याला इतके का घाबरतात? वाचा सुनील गावस्करांचं अचूक विश्लेषण
जसप्रीत बुमराह-सुनील गावस्कर
| Updated on: Mar 14, 2022 | 7:31 PM

मुंबई: बंगळुरुमध्ये भारत आणि श्रीलंकेत मालिकेतील दुसरा कसोटी (India vs srilanka 2nd Test) सामना सुरु आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 109 धावात आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit bumrah) अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने पहिल्यांदाच भारतात खेळताना एकाडावात पाच विकेट काढल्या. यापूर्वी परदेशात त्याने अशी कामगिरी केली आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या या डे-नाइट कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल आहे. पण पहिल्या डावात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने (Mohammed Shami) अचूक टप्प्यावर चेंडू टाकून श्रीलंकेच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. जसप्रीत बुमराह जास्त घातक वाटला. त्याच्या चेंडूची दिशा आणि टप्पा जबरदस्त होता.

श्रीलंकेच्या फलंदाजांकडे कुठलही उत्तर नव्हतं

श्रीलंकेच्या फलंदाजांकडे बुमराहच्या गोलंदाजीचं कुठलही उत्तर नव्हतं. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक करताना तो एक यशस्वी गोलंदाज असल्याचं म्हटलं आहे. रविवारी दुसऱ्यादिवशी भारताने फक्त 35 चेंडूत श्रीलंकेचा पहिला डाव संपवला. यात बुमराहचे दोन विकेट होते. जसप्रीत बुमराहने 2018 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो 29 कसोटी सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही 8 वी वेळ आहे. बुमराह आता सर्वात कमी कसोटी खेळून सर्वाधिक 5 बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने कपिल देव यांना मागे टाकले आहे.

त्याला फलंदाज घाबरतात

काल दुसऱ्यादिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्करांनी बुमरहाच कौतुक केलं. तो एक यशस्वी गोलंदाज आहे. प्रतिस्पर्धी संघांवर त्याने आपल्या गोलंदाजीने धाक निर्माण केलाय. मैदानावर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना त्याची भिती वाटते, असे गावस्कर म्हणाले. जसप्रीत बुमराहच्या यशाचे वर्णन करताना गावस्कर म्हणाले की, “त्याच्याकडे क्षमता, कौशल्य आहे. स्वत:वर विश्वास आहे तसेच कालच्या पेक्षा आज मी अधिक चांगली गोलंदाजी कशी करेन, स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा ध्यास त्याच्याकडे आहे” “प्रत्येक सामन्यागणिक त्याच्यात अधिकाधिक सुधारणा होत चालली आहे. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्याची इच्छा नसते” अशा शब्दात गावस्करांनी कौतुक केलं.

म्हणून तो अधिक घातक

“डे-नाईट कसोटीत लाईट खाली खेळताना प्रतितास 140 किमी वेगाने येणाऱ्या चेंडूचा सामना करणे सोपे नाहीय. फलंदाजाला काहीवेळा अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण दिवसा हे तितकं कठीण नाहीय. फलंदाज सेट झाल्यानंतर त्याला बाद करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. बुमराह गोलंदाजी करताना अनेक बदल करतो. यॉर्कर तर त्याच्याकडे आहे. पण चेंडू दोन्ही बाजूंना तो सहज कट करु शकतो. त्यामुळे तो अधिक घातक आहे” असे गावस्कर म्हणाले.