
टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ शुक्रवारी T20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलाय. अ गटातून भारत आणि यूएसए संघ सुपर-8 साठी पात्र ठरले आहेत. अमेरिकेने चार सामने खेळले ज्यामध्ये पाच गुण मिळवलेत. तर पाकिस्तानचा शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकला तरी देखील पाकिस्तानचे 4 पॉईंट होणार आहेत. त्यामुळे संघ जवळपास बाहेर पडला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पाकिस्तानला पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने प्रतिक्रिया दिलीये.
मोहम्मद कैफने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “पहिल्या सामन्यात मोहम्मद अमीरने सुपर ओव्हरमध्ये वाइड गोलंदाजी केली. ज्यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. पुढच्या सामन्यात 119 धावांचा पाठलाग करताना खराब फलंदाजी झाली. अनेक कॅच सुटले. पाकिस्तानने कॅनडाला हरवले पण त्या सामन्यात त्यांनी काहीही कौतुकास पात्र अशी कामगिरी केलेली नाही.”
कैफ पुढे म्हणाला की, “बाबर आझम भारताविरुद्ध सेट झाला होता पण तो सामना जिंकून देऊ शकला नाही. मोहम्मद रिझवानही चांगला खेळत होता. पण दोघेही सामना जिंकून देण्यात अपयशी ठरले. दोन्ही फलंदाज सेट झाले होते. पण दबावाखाली त्यांनी विकेट गमवली. दबावाखाली कोणीही चांगली फलंदाजी करु शकत नाही.”
कैफ पुढे म्हणाला, “चाहत्यांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत नाही. सगळीकडे गोंधळ सुरू आहे. अशांना कोण पाठिंबा देणार? प्रत्येकजण त्याच्या विरोधात उभा आहे. माजी खेळाडू देखील पाठिंबा देत नाहीत. पाकिस्तानने खुप खराब कामगिरी केली.’
भारत पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने ११९ धावा केल्या होत्या. या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाची शक्यता ९८ टक्के होती. तर भारताच्या विजयाची शक्यता फक्त दोन टक्के होती. पण तरी देखील पाकिस्तानच्या संघाला सामना जिंकता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि विजय खेचून आला. पाकिस्तान संघ फक्त ११२ रन करु शकला. भारतीय संघाने फक्त ६ धावांनी हा सामना जिंकला.