
देशांतर्गत क्रिकेट हंगामाला दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 28 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. त्याआधी बुची बाबू स्पर्धा खेळवण्यात येत आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेआधी अनेक खेळाडू बुची बाबू स्पर्धेत खेळत आहेत. पृथ्वी शॉ याने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र क्रिकेट टीमसाठी पदार्पणात शतक करत अप्रतिम सुरुवात केली. त्यानंतर आता आणखी एका महाराष्ट्राच्या फलंदाजाने शतक केलं आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने शतक ठोकत जोरदार कमबॅक केलं आहे. ऋतुराजने या शतकासह क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऋतुराजने हिमाचल प्रदेश विरूद्धच्या सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे.
महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश यांच्यातील सामना टीआय मुरुगप्पा मैदानात खेळवण्यात येत आहे. ऋतुराजने तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येत हे शतक केलं. ऋतुराजने 122 चेंडूत शतक पूर्ण केलं. ऋतुराजने या शतकी खेळीत 10 चौकार लगावले. ऋतुराजने 100 पैकी 40 धावा चौकारांच्या मदतीने केल्या.
ऋतुराजला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र ऋतुराजला 150 पर्यंतही पोहचता आलं नाही. ऋतुराजने 144 चेंडूत 133 धावा केल्या. ऋतुराजने या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. ऋतुराजने या शतकी खेळीसह निवड समितीला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ऋतुराजला यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं नाही.
ऋतुराजने या शतकी खेळीसह महाराष्ट्र टीमला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. ऋतुराज आणि अर्शीन कुलकर्णी या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. या दोघांनी 169 चेंडूत 220 धावा केल्या. अर्शीन यानेही शतक केलं. अर्शीनने 190 बॉलमध्ये 146 रन्स केल्या. अर्शीनने या खेळीत 16 चौकार आणि 1 षटकार लगावला.
दरम्यान ऋतुराज गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियापासून दूर आहे. तसेच ऋतुराजला अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयपीएलच्या 18 व्या हंगामातील काही सामन्यांना मुकावं लागलं होतं. कॅप्टन ऋतुराज बाहेर झाल्यानंतर पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनी याने नेतृत्वाची सूत्रं स्वीकारली होती. अशात आता अनेक महिन्यांच्या कमबॅकनंतर शतकी खेळीमुळे ऋतुराजच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते.