
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टी 20i आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने मोठा निर्णय घेतला आहे. विराटने 16 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या वनडे सीरिज दरम्यान डीडीसीए अर्थात दिल्ली डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांना याबाबतची माहिती दिली आहे. विराट देशांतर्गत क्रिकेटेमध्ये दिल्लीचं प्रतिनिधित्व करतो.
विराटने लिस्ट ए क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असल्याचं डीडीसीएला कळवलं आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंना विराटसोबत खेळण्याची संधी मिळेल. तसेच चाहत्यांसाठीही ही आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर विराटने डीडीसीएला खेळणार असल्याचं कळवलंय.
बहुप्रतिक्षित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला 24 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. विराटने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी उपलब्ध असल्याच सांगितलंय, अशी माहिती रोहन जेटली याने पीटीआयला दिलीय. या निमित्ताने विराट तब्बल 16 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विराट विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 2010 साली सर्व्हिसेज विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.
विराट सध्या फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळतो. विराटने 2024 वर्ल्ड कप फायनलनंतरच टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच विराटने अवघ्या काही महिन्यांपूर्वीच कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने रोहित आणि विराटला फिटनेस आणि कामगिरीवर लक्ष द्यायला सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर विराटने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
“विराट कोहली याने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी उपलब्ध असणार, अशी माहिती दिली आहे. विराट किती सामने खेळणार? हे निश्चित नाही. विराट असल्याने ड्रेसिंग रुममध्ये प्रोत्साहन मिळेल”, असा विश्वास रोहन जेटली यांनी व्यक्त केला.