टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने स्कॉटलंडला चिरडलं, 150 धावांनी उडवला धुव्वा

आयसीसी अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीत भारताने स्कॉटलंडचा धुव्वा उडवला. भारताने या सामन्यात स्कॉटलंडला 150 धावांनी पराभूत केलं. भारताने यापूर्वीच उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. आता भारतीय संघ जेतेपदापासून दोन विजय दूर आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने स्कॉटलंडला चिरडलं, 150 धावांनी उडवला धुव्वा
Image Credit source: ICC
| Updated on: Jan 28, 2025 | 3:33 PM

आयसीसी अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीत भारत आणि स्कॉटलंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा स्कॉटलंडच्या बाजूने लागला. स्कॉटलंडची कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच चूक झाली. कारण भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. गोंगाडी त्रिशा आणि जी कमालिनी यांनी पहिल्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली. त्यामुळे तिथेच स्कॉटलंड संघाचं कंबरडं मोडलं गेलं. कमालिनी 51 धावा करून बाद झाली. त्यानंतर गोंगाडीने आक्रमक पवित्रा काही सोडला नाही. तिने 59 चेंडूत नाबाद 110 धावांची खेळी केली. याते तिने 13 चौकार आणि 4 षटकार मारले. तर सानिका चाळके हीने 20 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. यासह भारताने स्कॉटलंडसमोर 20 षटकात 1 गडी गमवून 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं. पण हे आव्हान गाठताना स्कॉटलंड संघाची पुरती वाट लागली. स्कॉटलंडच्या विकेट एका पाठोपाठ एक धडाधड पडत केल्या. स्कॉटलंडचा डाव अवघ्या 58 धावांवर आटोपला. यासह भारताने या सामन्यात 150 धावांनी विजय मिळवला.

गोंगाडी त्रिशाला शतकी खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. शतकी खेळी करत आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत गोंगाडी त्रिशाने इतिहास रचला आहे. शतकी खेळी करणारी आयसीसी अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिली फलंदाज ठरली आहे. तिच्या शतकी खेळीमुळे भारताला 200 पार धावा करता आल्या.

या स्पर्धेत भारताची स्टार गोलंदाज असलेल्या वैष्णवी शर्माने पुन्हा एकदा कमाल केली. तीन विकेट्स घेत स्कॉटलंडला मॅचमध्ये पुनरागमन करण्याच्या संधीच दिली नाही. एम्मा वॉल्सिंगहॅम, नियाम मुइर आणि पिप्पा स्प्रिल यांच्या विकेट तिने घेतल्या.आयुषी शुक्लाने स्कॉटलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. एकाच षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर विकेट घेतल्या. पण हॅटट्रीकची संधी मात्र हुकली.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

स्कॉटलंड महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): पिप्पा केली, एम्मा वॉल्सिंगहॅम, पिप्पा स्प्रॉल (विकेटकीपर), नियाम मुइर (कर्णधार), नायमा शेख, शार्लोट नेवार्ड, अमेली बाल्डी, गॅब्रिएला फॉन्टेनला, मैसी मॅसिरा, मोली पार्कर, क्रिस्टी मॅकॉल.

भारत महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): जी कमलिनी (विकेटकीपर ), गोंगडी त्रिशा, सानिका चाळके, निकी प्रसाद (कर्णधार), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, भाविका अहिरे, आयुषी शुक्ला, शबनम मो. शकील, वैष्णवी शर्मा, सोनम यादव