Asia Cup 2025 : आशिया कपआधी मोठा झटका, स्टार बॉलर दुखापतीमुळे आऊट, टीम इंडिया अडचणीत

Akash Deep Injury : आशिया कप 2025 स्पर्धेला आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. मात्र त्याआधी जसप्रीत बुमराह याच्यानंतर आणखी एका गोलंदाजाला दुखापत झाली आहे. त्यामुळे या वेगवान गोलंदाजाला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

Asia Cup 2025 : आशिया कपआधी मोठा झटका, स्टार बॉलर दुखापतीमुळे आऊट, टीम इंडिया अडचणीत
Akash Deep and Mohammed Siraj Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 13, 2025 | 4:32 PM

भारताने शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली. भारताने 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरोत सोडवली. या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याने अप्रतिम कामगिरी केली. आकाशने धारदार बॉलिंगसह बॅटिंगनेही छाप सोडली. इंग्लंड दौऱ्यानंतर आता भारतीय संघ आगामी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी तयारी करत आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाश दीप याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आकाशला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

आकाशला इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यादरम्यान बॉलिंग करताना त्रास जाणवत होता. त्यामुळेच आकाशला दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळता येणार नाहीय. आकाश दीप दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इस्ट झोनसाठी खेळणार होता. इस्ट झोन संघाच्या नेतृत्वाची धुरा ईशान किशन याच्याकडे आहे.

इंग्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह यालाही दुखापत झाली होती. त्यानंतर आता आकाश दुखापतीच्या जाळ्यात अडकला आहे. भारतासाठी आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गोलंदाजांना दुखापत होणं चांगली चिन्हं नाहीत.

आशिया कप 2025 स्पर्धेतून आकाश दीप बाहेर?

आशिया कप स्पर्धेसाठी आकाश दीपच्या नावाची चर्चा नव्हती. मात्र दुखापतीमुळे आकाश या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर झाला आहे. त्यामुळे आता आकाशला फिटनेसवर काम करावं लागणार आहे.

आकाशचं कमबॅक केव्हा होणार?

आकाश वेळेत फिट झाल्यास त्याला विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकते. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेनंतर मायदेशात विंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत उभयसंघात 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान 2 सामने खेळवण्यात येणार आहेत.

आकाश दीपची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी

आकाश दीप इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी एकूण 3 सामने खेळला. आकाशने या 3 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या. तसेच आकाशने एका अर्धशतकासह एकूण 80 धावा केल्या. आकाशने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात नाईट वॉचमॅन म्हणून खेळताना हे अर्धशतक झळकावलं होतं. आकाशने या खेळीसह आपण बॅटिंगही करु शकतो, हे देखील सिद्ध करुन दाखवलं.