
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया 4 सप्टेंबरला यूएईला रवाना होणार आहे.भारतीय संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे.मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयच्या अपयशामुळे भारतीय संघाला आशिया कप स्पर्धेत जर्सी स्पॉन्सरशिवाय उतरावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआय आशिया कप स्पर्धेसाठी जर्सी स्पॉन्सर शोधण्यात अपयशी ठरल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बीसीसीआय क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयचा क्रिकेट विश्वात दबदबा आहे. मात्र बीसीसीआयचा जर्सी स्पॉन्सरचा शोध संपलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयला आशिया कप स्पर्धेसाठी स्पॉन्सर मिळालेला नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाच्या जर्सीवर स्पॉन्सरचं नाव नसणार, असं म्हटलं जात आहे. याआधी बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यात करार होता. मात्र काही दिवसांपूर्वी ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे ड्रीम 11 सह अनेक ऑनलाईन गेमिंगवर बंदी आली. त्यामुळे हा करार संपुष्टात आला आहे.बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यात 2023 साली करार झाला होता. हा करार 2026 पर्यंत होता. मात्र या बंदीमुळे करार संपुष्टात आला आहे.
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बीसीसीआयसमोर स्पॉन्सर शोधण्याचं आव्हान असणार आहे. तसेच भारताला स्पॉन्सर करणं खायचं काम नाही. बीसीसीआय 2027 पर्यंत स्पॉन्सर शोधत आहे. दीर्घ काळासाठी हा करार असल्याने स्पॉन्सर करायचं की नाही? याबाबत अनेक कंपन्या विचारात आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी टोयाटो स्पॉन्सर म्हणून इच्छूक असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्याबाबत कोणतीही अपडेट नाही.
आशिया कप स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाचा या स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघासमोर या स्पर्धेतील साखळी फेरीत यूएई, पाकिस्तान आणि ओमानचं आव्हान असणार आहे. भारताचा या मोहिमेतील पहिला सामना हा 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला भारतीय संघ कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. तर तिसरा आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघा ओमान विरुद्ध 2 हात करणार आहे.