
वुमन्स टीम इंडियाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मंधानाचं वनडे वर्ल्डकप विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. भारताकडून सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. इतकंच काय तर आयसीसीकडून प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कारही मिळाला. आता लवरकर स्मृती मंधानाच्या हाताला मेहंदी लागणार आहे. टीम इंडियाला वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी स्मृती लग्नबंधनात अडकणार आहे. प्रियकर पलाश मुच्छलसोबत येत्या 23 नोव्हेंबरला लग्नगाठ बांधणार आहे. पण या लग्नाआधीच आनंदोत्सव साजरा केला जात आहे. वनडे वर्ल्डकप विजयानंतर हे लग्न खास असणार आहे. भारतीय संघाचे सहकारी खेळाडू तिच्या लग्नासाठी सांगलीत दाखल झाले आहेत. तिच्यासोबत लग्नाच्या रिती रिवाजात भाग घेत आहे. त्याची एक झलक जेमिमा रॉड्रिग्सने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दाखवली आहे.
संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या लगे रहो मुन्नाभाईच्या ‘समझो हो ही गया..’ गाण्यावर रील बनवला आहे. यात स्मृती मंधाना, श्रेयंका पाटील, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी नाचताना दिसत आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती आणि पलाशला पत्र लिहून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच स्मृती मंधानाने वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर 7 लोक कल्याण मार्ग येथे पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. मोदींनी मंधानाच्या क्रिकेट आणि पलाशच्या संगीतातील जुगलबंदीचे कौतुक केले.
स्मृती मंधानाचा होणारा नवरा पलाश मुच्छाल बॉलीवूड गायिका पलक मुच्छल हीचा धाकटा भाऊ आहे. तसेच एक संगीतकार, चित्रपट निर्माता आणि गीतकार आहे. 2019 पासून ते एकमेकांना डेट करत होते. इतकंच काय तर वर्ल्डकप विजयानंतर पलाशने हातावर स्मृतीच्या नावाचा एक गोंडस टॅटू गोंदल्याचं दाखवलं होतं. पलाश मुच्छल हा मध्य प्रदेशातील इंदूरचा रहिवासी आहे. त्यामुळे स्मृती इंदूरची सून होणार आहे. मुच्छलने 17 ऑक्टोबरला मध्य प्रदेशातील स्टेट प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लग्नाचे संकेत दिले होते.