‘माझ्या कर्णधारपदाला गिलकडून काहीच भीती नाही’, सूर्यकुमार यादवच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
शुबमन गिलकडे कसोटी आणि वनडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. इतकंच काय तर टी20 फॉर्मेटमध्येही त्याच्याकडे उपकर्णधारपद आहे. असं असताना सूर्यकुमार यादवच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेमकं काय म्हणाला ते जाणून घ्या.

टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी जबरदस्त आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पराभूत केलं. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. भारतीय संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात उतरणार आहे. यात काही शंका नाही. पण सध्या त्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार असल्याची जोरदार चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. कारण शुबमन गिलची टी20 संघात एन्ट्री झाली आणि त्यातही त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवल्याने तशीच भीती आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शुबमन गिल टी20 संघाचा पुढचा कर्णधार असेल अशी चर्चा रंगली आहे. असं असताना कर्णधार सूर्यकुमार यादव याने यावर भाष्य केलं आहे.
टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, ‘अशी चर्चा तुम्हाला चांगलं काम करण्यास प्रोत्साहन देते. आम्हा दोघांमध्ये मैदानात आणि मैदानाबाहेर चांगले संबंध आहेत. मला माहिती आहे की तो कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे. तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे. यामुळे मला स्वत:ला काही चांगलं करण्याची प्रेरणा मिळते. मी भीती खूप आधीच सोडून दिली आहे. माझं स्पष्ट मत आहे की, जर एखादी गोष्ट फॉलो करत आहे, तर ती फॉलो केली पाहीजे. मी खरंच मेहनत घेत असेल तर सर्वकाही ठीक होईल. पण त्याच्यासाठी खरंच खूप आनंदी आहे. त्याने खरंच चांगलं केलं आहे. ‘
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला फक्त अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असं असताना सूर्यकुमार यादवचा बिनधास्त अंदाज चाहत्यांना आवडला आहे. याबाबत सूर्यकुमार यादवला विचारलं असता तो म्हणाला की, ‘मी मैदानात खूप रिलॅक्स असतो. तेव्हाही जेव्हा माझ्यावर प्रेशर असतं. फिल्डिंगवेळी मी हसत असतो. मी गोलंदाजांना त्यांचं म्हणणं सांगू देतो. कारण गोलंदाजांच्या मनात बरंच काही सुरु असतं. ही एक टीम आहे आणि सर्वांचं ऐकणं आवश्यक आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येतं.’
