
युवा फलंदाज शुबमन गिल याची रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. शुबमन गिल याला बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्याआधी कर्णधारपदाची जबाबदारी दिली. अनेक खेळाडूंच्या कामगिरीत कर्णधारपदाच्या जबाबदारीनंतर घसरण पाहायला मिळते. मात्र शुबमनसोबत उलट झालं. शुबमनने बॅटिंगसह पहिल्याच कसोटी मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी सार्थपणे पार पाडली. शुबमनने त्याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. इतकंच नाही तर शुबमन इंग्लंड-भारत कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
भारतीय संघाने पाचवा आणि अंतिम सामना जिंकत मालिका बरोबरीत राखली. शुबमनने या मालिकेत फलंदाज आणि कर्णधार म्हणून स्वप्नवत कामगिरी केली. त्यानंतर आता शुबमनला मोठी जबाबदारी मिळाली आहे. शुबमनला टीम इंडियानंतर आणखी एका स्पर्धेसाठी नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
शुबमनने इंग्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर आता शुबमन दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेत नॉर्थ झोनचं कर्णधारपद सांभाळणार आहे. या स्पर्धेला 28 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. गिलने गेल्या वेळेसही या स्पर्धेत नेतृत्व केलं होतं. तेव्हा शुबमनने एका सामन्यात कर्णधारपद सांभाळलं होतं.
शुबमनने इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांमधील 10 डावांमध्ये 754 धावा केल्या. शुबमन यासह एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. मात्र शुबमनची सुनील गावसकर यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी अवघ्या काही धावांनी हुकली. शुबमनने या मालिकेत 4 शतकांसह 1 द्विशतकही झळकावलं. त्यामुळे शुबमन दुलीप ट्रॉफीत कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.
तसेच यंदा नॉर्थ झोनचं नेतृत्व करताना गिलसमोर एक आव्हान असणार आहे. यंदा दुलीप ट्रॉफी स्पर्धा पारंपरिक झोनल फॉर्मेटने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत प्रत्येक राज्यातील निवड समिती खेळाडूंची निवड करतील.
नॉर्थ झोन टीम : शुबमन गिल (कर्णधार), शुबम खजूरिया, अंकित कुमार (उपकर्णधार), आयुष बडोनी, यश ढुल, अंकित कलसी, निशांत सिंधु, साहिल लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंह चरक, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, अंशुल कंबोज, कन्हया वधावन (विकेटकीपर) आणि औकिब नबी.
स्टँडबाय : शुभम अरोरा (विकेटकीपर), जसकरनवीर सिंह पॉल, रवी चौहान, आबिद मुश्ताक, निशंक बिर्ला, उमर नजीर आणि दिवेश शर्मा.