
पावसाच्या व्यत्ययामुळे अनेकदा क्रिकेट सामने रद्द करण्याची वेळ आहे. कधी कधी तर डकवर्थ लुईस नियमाने टार्गेट सेट केलं जातं. अनेकदा तर पावसामुळे पुढचा सामनाच होऊ न शकल्याने डकवर्थ लुईस नियामने विजयी घोषित केला जातो. यामुळे क्रीडारसिकांचा अनेकदा भ्रमनिरास झाला आहे. हातात असलेला सामना अशा पद्धतीने गमवण्याची वेळ आल्याने नाराजीही व्यक्त केली आहे. पण या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने पावलं उचलली आहेत. यामुळे क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तरी सामना थांबवण्याची वेळ येणार नाही. मैदानात पावसाचा संबंध नसल्याने ते सुकवण्यासाठीही धडपड करावी लागणार नाही. ऑस्ट्रेलिया सरकारने जगातील पहिलं ऑल वेदर स्टेडियम बांधण्याची योजना आखली आहे. यामुळे पावसाचा व्यत्यय आला तरी डकवर्थ लुईस नियमाची गरज भासणार आहे. सामना निर्विघ्नपणे पार पडेल. या मैदानामुळे पावसाच्या चार महिन्यातही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकतं.
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये मार्वल स्टेडियम बांधलं आहे. या स्टेडियमला छत आहे. पण या मैदानावर अनेकदा चेंडू छताला लागल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या मैदानात आता क्रिकेट सामने होत नाहीत. पण हे मैदान आता इतर खेळांसाठी वापरलं जातं. आता ऑस्ट्रेलिया सरकारने खास क्रिकेटसाठी स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानावर सर्वच ऋतुत खेळता येईल. यासाठी खास डिझाईन तयार केलं असून. छताला गोलाकार काच लावण्यात येणार आहे. जेणेकरून सकाळी आणि पावसातही येथे सामने सुरळीतपणे पार पडतील.
मैदानात 2300 प्रेक्षक बसतील अशी योजना आहे. क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांसाठीही हे मैदान वापरलं जाईल. त्यामुळे ही कल्पना यशस्वी ठरली तर इतर देशातही असे स्टेडियम उभारले जातील. त्यामुळे विनाखंड स्पर्धा पार पडतील. तसेच क्रीडाप्रेमींना खेळाचा आनंद घेता येईल.कॉक्स आर्किटेक्चरचे सीईओ एलिस्ट रिचर्डसन यांनी सांगितलं की, या स्टेडियमची आखणी क्रिकेटच्या दृष्टीने बसवण्यात आली आहे. याचं छप्पर खूप उंच असेल. जेणेकरून छताला चेंडू लागण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. या स्टेडियमचं काम लवकरच सुरु होईल आणि 2028 पर्यंत त्याचं उद्घाटन होईल.