
एडिलेड: टीम इंडियाने बुधवारी एडिलेडच्या मैदानात एक रोमांचक विजय मिळवला. टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 रन्सनी मात केली. यामुळे टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग सुकर झालाय. खरंतर या मॅचमध्ये पावसाने महत्त्वाची भूमिका बजावली. कारण पावसानंतर सगळा खेळच पालटला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. त्यांनी बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांच लक्ष्य दिलं होतं.
पावसानंतर पालटला खेळ
6 व्या ओव्हरनंतर पाऊस सुरु झाला. त्यामुळे चार ओव्हर्स कमी करण्यात आल्या. बांग्लादेशला विजयासाठी 16 षटकात 151 धावांच टार्गेट देण्यात आलं. पाऊस सुरु होण्याआधी बांग्लादेशच्या 6 ओव्हर्समध्ये बिनबाद 66 धावा झाल्या होत्या. पण पावसानंतर त्यांची घसरण सुरु झाली. सर्व खेळच पालटला.
डग आऊट एरियामध्ये काय चाललेल?
मैदानात पाऊस सुरु असताना डग आऊट एरियामध्ये बऱ्याच घडामोडी घडत होत्या. “पाऊस थांबल्यानंतर बांग्लादेशी टीमची मैदानात उतरण्याची अजिबात इच्छा नव्हती. डकवर्थ लुईसच्या नियमाने पुढे असल्यामुळे आपण जिंकणार हे त्यांना माहित होतं. रोहित शर्मा आणि त्यांचा कॅप्टन शाकीब अल हसन अंपायर्स बरोबर चर्चा करत होते” अशी माहिती टीम इंडियातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलय.
बांग्लादेशने चर्चेसाठी मॅनेजरला पाठवलं
सामना सुरु होणार की, नाही याबद्दल सर्वांच्या मनात चिंता होती. टीम इंडियाचे डोळे आकाशाकडे आणि दोन अंपायर्स ख्रिस ब्राऊन, इरास्मस यांच्याकडे लागले होते. पाऊस थांबल्यानंतर अंपायर्संनी दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला बोलावलं. बांग्लादेशने ऑन फिल्ड चर्चेसाठी मॅनेजरला पाठवलं. पण अंपायर कॅप्टन शाकीबच्या उपस्थितीसाठी आग्रही होते.
शाकीबची काय तक्रार होती?
डकवर्थ लुइस मेथडने बांग्लादेशला 16 ओव्हर्समध्ये 151 धावांच टार्गेट देण्यात आलं होतं. शाकीबने इरास्मस यांच्याबरोबर दीर्घ चर्चा केली. मैदान ओलसर असल्याची त्याची तक्रार होती. पण गोलंदाजांसाठी रन-अप शक्य असल्याने मॅच सुरु करावी, असं अंपायर्सच मत होतं. रोहित बांग्लादेशच्या कॅप्टनची समजून घालून त्यांच्या फलंदाजांनी मैदानात उतरावं, यासाठी प्रयत्न करत होता.
आपल्याकडे दुसरा पर्याय होता का?
पाऊस थांबल्यानंतर मैदानात उतरण्याच्या तू विरोधात होतास का? असा प्रश्न नंतर शाकीबला विचारण्यात आला. त्यावर त्याने आपल्याकडे दुसरा पर्याय होता का? असा प्रतिप्रश्न केला. शाकीबने आपली असमर्थता प्रगट केली. टीम इंडियाने या सामन्यात एका रोमांचक विजयाची नोंद केली.