वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

आयसीसीच्या सर्वसाधारण बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. त्यात वनडे आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत घेतलेले निर्णय चर्चेत आहेत. या दरम्यान वेस्ट इंडिज संघाबाबत एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे विंडीज बोर्ड आणि संघ बांधणी करण्यास मदत होईल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल
वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 15, 2026 | 10:39 PM

क्रिकेट जगतात एक काळ वेस्ट इंडिजने गाजवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा होता. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वात जेतेपद मिळवण्याचा मान मिळवला आहे. पण मागच्या काही वर्षात वेस्ट इंडिज क्रिकेटला उतरण लागली आहे. दिग्गज संघ म्हणून ख्याती असलेल्या वेस्ट इंडिजची वाताहत झाली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. त्यामुळे संघ बांधणी आणि खेळाडूंना मानधन देताना हात आखुडता घ्यावा लागतो. योग्य मानधन मिळत नसल्याने अनेक खेळाडूंनी आपल्या व्यथाही बोलून दाखवल्या आहेत. असं असताना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने यासाठी आयसीसीकडे गाऱ्हाणं घातलं होतं. आता आयसीसीने वेस्ट इंडिज क्रिकेटच्या मदतीसाठी मोठी घोषणा केली. आयसीसीच्या सर्वसाधारण बैठकीत जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली मदतीचा निर्णय घेतला गेला आहे. आयसीसीकडून वेस्ट क्रिकेट बोर्डाला 12.82 मिलियन डॉलर म्हणजेच 123 कोटी रुपये कर्ज म्हणून दिले जाणार आहे.

वेस्ट इंडिजला आयसीसीकडून मदत मिळाली, कारण..

आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण बैठक एडिनबर्ग येथे मागच्या आठवड्यात पार पडली. यात वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला कर्ज देण्यावर एकमत झालं. माहितीनुसार, विंडीज क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती आणि त्यांनी मदतीचा हात मागितल्याने आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. सदस्यत्व आणि सदस्य देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीशी संबंधित महत्त्वपूर्ण बदल करत हा निर्णय घेतला आहे. क्रिकबझच्या एका अहवालानुसार, वेस्ट इंडिज बोर्डाला गेल्या आर्थिक वर्षात 28 मिलियन डॉलर्सचा तोटा झाला असून, चालू आर्थिक वर्षात हा तोटा 26 मिलियन डॉलर्स असण्याचा अंदाज आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये, तसेच खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि सामनाधिकाऱ्यांना मानधन मिळावं यासाठी हा निर्णय घेतला गेला. वेस्ट इंडिज क्रिकेट वाचवण्यासाठी आयसीसीकडून हे कर्ज दिलं गेलं आहे.

आयसीसीला मिळाला नवा सदस्य

आयसीसीने वार्षिक सर्वसाधारण बैठकीत एका नव्या क्रिकेट संघाबाबतही घोषणा केली आहे. मॉरिशस क्रिकेटला असोसिएट सदस्य देश म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आयसीसी मान्यता प्राप्त क्रिकेट सदस्यांची संख्या आता 111 झाली आहे. यात 12 पूर्ण सदस्य देश आहेत. दुसरीकडे, आयसीसीकडून फ्रान्स क्रिकेटला सदस्यत्वाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. तर कॅनडा क्रिकेटवरील बंदी उठवण्याचा निर्णयही घेतला आहे.

Follow Us