IPL 2026: लखनौ सुपर जायंट्सची निराशाजनक कमगिरी, ऋषभ पंतचा पत्ता होणार कट? त्या विधानानंतर चर्चा
आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचा शेवटही पराभवाने झाला. या स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली. असं असताना लखनौ सुपर जायंट्स संघात कात्री चालणार हे नक्की झालं आहे. या कात्रीत कर्णधार ऋषभ पंत येण्याची शक्यता अधिक आहे.

PBKS vs LSG: आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजक आहे. या स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने 14 सामने खेळले आणि फक्त चार सामन्यात विजय मिळवला. तर 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. त्यामुळे 8 गुणांसह या पर्वात सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघात पुढच्या पर्वापूर्वी उलथापालथ होणार हे नक्की झालं आहे. आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी लखनौ संघातील काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत डायरेक्ट ऑफ क्रिकेट टॉमी मूडी यांच्या वक्तव्यानंतर मिळाले आहेत. टॉम मूडी यांनी लीडरशिपवर विचार करण्याचं विधान केलं आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतवर गदा येणार असं दिसत आहे. यापूर्वीही मिडिया रिपोर्टमध्ये, पंतसाठी लखनौसोबतचं हे शेवटचं पर्व असेल असं सांगण्यात आलं आहे.
काय म्हणाले टॉम मूडी?
आयपीएलच्या सलग दोन पर्वात ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे बदल करणं भाग असल्याचं दिसत आहे. टॉम मूडी यांनी सांगितलं की, संघ नेतृत्वाच्या बाबतीत भविष्याचा विचार करता या पदावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सध्याच्या आयपीएल हंगामामुळे इतर अनेक विभागांमधील उणिवा समोर आल्या आहेत, ज्यांवरही लक्ष देण्याची गरज आहे.
लखनौकडून 27 कोटी घेणाऱ्या पंतने काय केलं?
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी ऋषभ पंतवर लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटींची बोली लावली. पंतकडून कर्णधार आणि फलंदाज अशा दुहेरी भूमिकेची अपेक्षा होता. मात्र दोन्ही आघाड्यांवर ऋषभ पंत अपयशी ठरला. आयपीएल 2025 स्पर्धेतील 14 सामन्यातील 13 डावात त्याने 269 धावा केल्या. त्यावेळी संघ सातव्या क्रमांकावर राहिला. आता आयपीएलच्या 19व्या पर्वात 14 सामन्यातील 13 डावात 312 धावा केल्या. यावेळी संघ दहाव्या क्रमांकावर राहिला. ऋषभ पंतच्या अडचणी केवळ आयपीएलपुरत्या मर्यादित नाहीत. अफगाणिस्तान मालिकेसाठीच्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातून त्याला नुकतेच वगळण्यात आले आहे. इतकंच काय तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याला उपकर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. त्याची जबाबदारी आता केएल राहुलकडे आहे.