IND vs SL : भारत श्रीलंका सामन्याचा टर्निंग पॉइंट, कर्णधार चरीथ असलंकाने सांगितलं 48वं षटक टाकण्याचं कारण

भारत आणि श्रीलंका यांच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. खरं तर या सामन्यात श्रीलंकन गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण भारताच्या तोंडातून विजयाचं घास खेचून आणला. तसेच या सामन्यात 48वं षटक महत्त्वाचं ठरलं. हे षटक खुद्द कर्णधार चरीथ असलंका याने टाकलं.

IND vs SL : भारत श्रीलंका सामन्याचा टर्निंग पॉइंट, कर्णधार चरीथ असलंकाने सांगितलं 48वं षटक टाकण्याचं कारण
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 02, 2024 | 10:58 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना पहिला सामना बरोबरीत सुटला. भारताला 2 गडी हातात आणि 15 चेंडू शिल्लक असताना 1 धाव करता आली नाही. त्यामुळे हा सामना जरी बरोबरीत सुटला असला तरी श्रीलंकेचं कौतुक होत आहे. कारण हा सामना भारताच्या पारड्यात पूर्णपणे झुकलेला होता. हा सामना श्रीलंका आता खेचून आणेल अशी जराही स्थिती नव्हती. पण नको तेच झालं. 1 धाव करणं शेवटच्या दोन फलंदाजांना जमलं आणि सामना बरोबरीत सोडवण्याची वेळ आली. दुसरं या सामन्यात सुपर ओव्हर नसल्याने निकाल लागण्याचा प्रश्नच आला नाही. त्यामुळे सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा संतापलेला दिसला. ‘ सरतेशेवटी, थोडे निराशाजनक, 14 चेंडूत 1 धाव मिळवता आली नाही. या गोष्टी घडतात. श्रीलंकन संघ चांगला खेळला. शेवटी हा एक न्याय्य निकाल होता.’, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

श्रीलंकेचा कर्णधार चरीथ असलंकाने सांगितलं की, ‘आम्ही विजयासाठी दिलेल्या धावांचा बचाव करू असा आमचा विश्वास होता. पण 230 धावांखाली रोखण्यासाठी आम्हाला अधिक चांगलं करण्याची गरज होती. दुपारनंतर चेंडू वळण्यास सुरुवात झाली होती. पण लाईटखाली फलंदाजी करणं सोपं झालं होतं. जेव्हा डावखुरा फलंदाज फलंदाजीला आला तेव्हा मला वाटलं की मी गोलंदाजी करू शकतो. कारण चेंडू फिरत होता. खेळाडूंचा मैदानातील उत्साह पाहून आनंदी आहे. दुसऱ्या टप्प्यात खूप चांगलं खेळलो. दुनिथ आणि निसंका खरंच चांगले खेळले.’ चरीथ असलंकाने 8.5 षटकं टाकत 30 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. 18 चेंडूत 5 धावांची गरज असताना त्याने हाती चेंडू घेतला. पहिले दोन चेंडू निर्धाव गेले. तिसऱ्या चेंडूवर शिवम दुबेने चौकार मारला आणि सामना बरोबरीत आला. अवघी एक धाव हवी असताना चौथ्या चेंडूवर शिवम दुबे पायचीत झाला. त्यानंतर आलेला अर्शदीप सिंगही चाचपडला आणि पायचीत होत तंबूत परतला.

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटल्याने 0-0 अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढच्या दोन्ही सामन्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. आता दोन सामन्यात कोण कशी कामगिरी करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना 4 ऑगस्टला कोलंबोच्या मैदानात आहे.