IND vs PAK Final : समीर मिन्हासची तडाखेदार खेळी, टीम इंडियासमोर 348 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

U19 Asia Cup Final India vs Pakistan : पाकिस्ताने अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडियासमोर 348 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानला इथवर पोहचवण्यात समीर मिन्हास याने प्रमुख योगदान दिलं.

IND vs PAK Final : समीर मिन्हासची तडाखेदार खेळी, टीम इंडियासमोर 348 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
Sameer Minhas IND vs PAK Asia Cup Final 2025
Image Credit source: ACC X Account
| Updated on: Dec 21, 2025 | 3:44 PM

समीर मिन्हास याने केलेल्या तडाखेदार दीडशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर 348 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 327 धावा केल्या. पाकिस्तानसाठी समीर मिन्हास याने सर्वाधिक 172 धावांची विक्रमी खेळी साकारली. तर अहमद हुसैन याने अर्धशतकी खेळी. टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांना कर्णधार आयुष म्हात्रे याचा निर्णय योग्य ठरवता आला नाही. भारतीय गोलंदाज पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले.  त्यामुळे आता टीम इंडिया 348 धावा करत आशिया कपवर नाव कोरणार की पाकिस्तान मैदान मारणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

पाकिस्तानची बॅटिंग

हामझा झहूर आणि समीर मिन्हास या सलामी जोडीने 32 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर हेनिल पटेल याने हामझा झहूर याला आऊट करत पाकिस्तानला पहिला झटका दिला. त्यानंतर समीरने उस्मान खान याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 79 चेंडूत 92 धावांची भागीदारी केली. खिलन पटेल याने उस्मान खान याला आऊट केलं आणि या भागीदारीला ब्रेक लावला. उस्मानने 35 धावा केल्या.

समीर मिन्हासची तडाखेदार खेळी

त्यानंतर समीर आणि अहमद हुसैन या जोडीने मोठी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. अहमद आणि समीर या दोघांनी 125 बॉलमध्ये 137 रन्सची पार्टनरशीप केली. अहमद आऊट होताच पाकिस्तानने तिसरी विकेट गमावली. अहमदने 72 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. मात्र टीम इंडियाला समीर मिन्हास याची विकेट हवी होती. समीर दीडशतक करुन नाबाद खेळत होता. त्यामुळे टीम इंडियासमोर समीरला कोणत्याही स्थितीत रोखण्याचं आव्हान होतं. दीपेश देवेंद्रन याने भारताची प्रतिक्षा संपवली.

दीपेशने समीरला कनिष्क चौहान याच्या हाती कॅच आऊट केलं. समीरने 113 बॉलमध्ये 17 फोर आणि 9 सिक्सच्या मदतीने 172 रन्सची वादळी खेळी केली. त्यानंतर हुझेफा अहसान याला भोपळाही फोडता आला नाही. कॅप्टन फरहान यूसफ याने 19 धावा केल्या. मोहम्मद शायान याने 7 तर अब्दुल सुभान याने 2 धावा केल्या. तर निकाब शफीक आणि मोहम्मद सय्याम या दोघांनी अखेरच्या काही षटकांत छोटेखानी खेळी केली. निकाबने नाबाद 12 धावा केल्या. तर सय्याम याने नॉट आऊट 13 रन्स केल्या.

टीम इंडिया 348 धावा करणार?

टीम इंडियासाठी दीपेश देंवद्रन याने 3 विकेट्स घेतल्या. तर हेनिल पटेल आणि खिलान पटेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कनिष्क चौहान याने 1 विकेट मिळवली. आता भारतीय फलंदाज हे विक्रमी आव्हान पूर्ण करणयात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.